November 9, 2021

ऋण



सुंदर कथा  'ऋण'


पोस्टमनने आणलेले पोस्ट हातात तोलत दत्तू ऑफिसकडे आला. चार पाच चेहरे त्याच्याकडे नेहमीच्या आशेने पहात होते. हो..कारण या 'आशा दीप' नावाच्या वृद्धाश्रमात पन्नास एक वृद्ध रहात असले तरी पत्र यायची ती फक्त मोजक्या चार पाच जणांनाच. त्यामुळे अधून मधून पोस्टमन येउन पोस्ट गेटवरच दत्तूकडे देउन जायचा,  तेंव्हा हे ठरावीक लोकच त्यांच्या नावाचे पत्र आलय का हे ऐकायला उत्सुक असायचे. बाकीचे सिनीयर सिटीझन्स आपले त्याच्याशी काही देणे नाही या अविर्भावात,  बाजूच्या वाचन कट्ट्यावर पेपर किंवा पुस्तक घेउन वाचत बसलेले असत.  किंवा मग कोप-यावरच्या हॉलमधे जाउन कैरम, पत्ते खेळत बसत असत. 


त्यामुळे दत्तूने जेंव्हा हाक दिली 'देशमुख काका... तुमच्या नावाचं पाकीट आलय..घेउन जा..' तेंव्हा पुस्तक वाचनात गढून गेलेले आप्पा देशमुख आधी चपापलेच. 


'आपल्याला कोणाचे पत्र आले असेल?' असा आधी विचार करुन त्यांनी शेजारी बसलेल्या नाना वर्टीकर यांच्याकडे पाहिले. नानांनी तोंडात 'बार' भरला होता. मानेनेच 'जाउन या..बघा काय आलय..' असे नानांनी आप्पांना सुचवले तसे आप्पा  लगबग ऑफिसमधे आले. रजिस्टरला नोंद करुन ते जाडजूड envelope आपल्या हातात घेउन ते उठले. 


पाकीट दिल्लीवरुन स्पिड पोस्टने पाठवलेले होते. 

त्यावर पाठवणा-याचे नाव नव्हते. फक्त एवढेच लिहीले होते

If undelivered, please return to

Assistant Secretary-Planning

Ministry of Finance

10, Sansad Marg, New Delhi-01


आप्पा देशमुख ला दिल्लीवरुन कसलेसे जाडजूड टपाल आलय हे एव्हाना दत्तूकरवी सर्वांना समजले होते. 

सारेजण आप्पांभोवती जमा झाले..

मग एक एक प्रतिक्रिया येउ लागल्या..


'काय रे आप्पा, या वयात लव्ह लेटर आले काय तुला? एवढं दिवस सांगितलं नाहीस आम्हाला ते..' आबा क्षिरसागरने आप्पांची खेचली आणि एकच हास्य कल्लोळ झाला.


'अरे आबा..लव्ह लेटर नसेल..उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घ्यायला दिल्लीला बोलावलं असेल राष्ट्रपतींनी आप्पाला..तो मास्तर म्हणून रिटायर होउन पाच वर्षे झालीयेत हे लक्षात नसेल आले त्यांच्या..' बापू देशपांडे बोलले तसे सगळे पुन्हा एकदा हसले. 


'छे रे..बापू..अरे पत्र बघ कोणाकडून आलय..Department of Planning, Ministry of Finance. आयला, म्हणजे आप्पाला planning commision मधे घेताहेत की काय? अभिनंदन आप्पा..!!' पांडूकाका पवार बोलले. 


तेवढ्यात आपला तंबाखूचा तोबरा थुंकून परत जागेवर आलेल्या नाना वर्टीकरने सगळ्यांना शांत केले..

'अरे बाबांनो..असा अंदाज लावत बसण्यापेक्षा आप्पाला ते पाकीट उघडू तरी द्यात. काय ते कळेलच...ए आप्पा.. उघड रे ते पाकीट..'


आप्पानी नानांच्या आदेशा प्रमाणे पाकीटाची एक कड  कात्रीने सावकाश कापली. आता तसेही त्यांच्या आयुष्यात काही सिक्रेट्स नव्हते. तीन वर्षापूर्वी पत्नी गेली अन सुने बरोबर पटेनासे झाले तसे ते मुलाला सांगून स्वतःच या वृद्धाश्रमात येउन राहिले होते. मुलगा महिन्यातून एकदा येउन त्यांना भेटून जायचा. शाळेची पेन्शन यायची त्यात त्यांचे भागायचे. आता हा वृद्धाश्रम आणि इथले मित्र हेच त्यांचे कुटुंब झाले होते. आता त्यांचे खाजगी, वैयक्तिक असे काही नव्हतेच. म्हणूनच हे पाकीट सर्वांसमक्ष उघडायला त्यांना कुठली भिड वाटली नाही. 


पाकीटात तीन चार गोष्टी होत्या. आधी एक ग्रिटींग कार्ड निघाले. त्यावर गुरु आणि शिष्याचे एक सुंदर भित्तीचित्र होते व त्यावर सुवाच्य अक्षरात एक मेसेज लिहीला होता..


'माझ्या शालेय जीवनातच मला जीवनाची खरी दिशा दाखवणारे माझे देशमुख गुरुजी यांना शिक्षक दिना निमीत्त सप्रेम नमन.'

खाली फक्त नाव होते..आरती.


नानांनी ते ग्रिटींग पाहिले व म्हणाले..'अरे आप्पाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छापत्र आहे हे..आरती नावाच्या...'


आप्पा विचारात पडले. पस्तीस वर्षांच्या शिक्षकी कारकिर्दीत, आरती नावाच्या अनेक मुली त्यांच्या विद्यार्थिनी होत्या.  तीन चार विद्यार्थिनी त्यांना आठवतही होत्या.  पण 'ही' त्यातली नक्की कोण हे त्यांना लक्षात येत नव्हते. 


'ते बघ आत एक चिठ्ठी देखील आहे ती वाच..' 


आतून एक छान गुळगुळीत पण उच्च प्रतिच्या स्टेशनरीचा कागद बाहेर आला व त्यावर सुवाच्य अक्षरात एक पत्र लिहीले होते. आश्रमात 'पत्र वाचन' हा बापू देशपांडेंचा प्रांत.

आप्पांनी त्यांच्याकडे ते पत्र वाचायला दिले. 


बापू देशपांड्यांनी आपल्या खणखणीत आवाजात पत्र वाचायला सुरु केले..


'प्रिय सर,


मी तुमची विद्यार्थिनी आरती देसाई. 

मला ठाउक नाही की तुम्हाला मी पटकन चेह-यानिशी आठवेन की नाही. कारण 'देसाई  बाल अनाथ आश्रमा'त वाढलेल्या माझ्यासारख्या  बहुतेक मुला मुलींची आडनावे ही देसाईच असायची व अशी बरीच मुले मुले आपल्या शाळेत होती. तुमच्या हातून कुठल्या न कुठल्या इयत्तेत इंग्रजी शिकला नाही असा एकही विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळेतून बाहेर पडला नसेल. त्यातली एक भाग्यवान विद्यार्थिनी मीही होते. 


सर, आम्ही अनाथालयात राहणारी मुले. इतर मुलांसारखे मधल्या सुट्टीत डबे नसायचे आम्हाला. मला अजूनही आठवतं..वर्गातल्या प्रत्येक देसाई आडनावाच्या मुला मुलीला तुम्ही रोज मधल्या सुट्टीत पाच रुपये द्यायचात. खरे तर आम्हीच मिळून तुमच्याकडे यायचो व ते तुमच्याकडून हक्काने घ्यायचो. आपल्याच गुरुकडून पैसे मागायची भिड नाही वाटायची तेंव्हा आम्हाला. त्यात तुम्ही आम्हाला जवळचे वाटायचात. 


तुम्ही दिलेल्या त्या पैशातून आम्ही 'देसाई मुले मुली' मिळून कधी चिरमुरे, कधी बिस्कीटे, कधी भडंग पाकीट असे काही एकत्र घेउन खायचो. बिकट परिस्थितीला एकत्र लढण्याची ताकत व हिंमत, दोन्ही, तुम्ही आम्हा मुलांना त्या न कळत्या वयात दिलीत. तुमच्यामुळेच आज ही मुले कुठे ना कुठे सुव्यवस्थित पोजीशन वर कार्यरत आहेत.


मला तुम्ही मी आठवीत असताना  शिकवलेली ती कविता,  जशी तुम्ही शिकवली, तशीच अजूनही आठवते


'The Woods are lovely dark and deep

But I have promises to keep 

And miles to go before I sleep..'


या कवितेतून तुम्ही दिलेली प्रेरणा मला आजन्म पुरणारी होती..आहे. मी आता गेल्यावर्षी  IAS ची परिक्षा उत्तीर्ण होउन दिल्ली मधे अर्थ खात्यात Planning Department मधे Assistant Secretary या पदावर गेल्या सहा महिन्यांपासून रुजु झाली आहे. इथे आल्यापासून मी तुमचा शोध सुरु केला व मला काही जुन्या मित्रांकरवी ही माहिती मिळाली की तुम्ही..'इथे' आहात. 


सर, मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्या बाबांच्या जागी असलेल्या माझ्या सरांना आज वृद्धाश्रमात रहावे लागत आहे, ही कल्पनाच मी सहन करु शकत नाही.  या लिफाफ्यात एक विमानाचे तिकीट पाठवत आहे. तुम्ही दिल्लीला माझ्याकडे, आपल्या मुलीकडे या, हवे तितके दिवस, महिने माझ्याबरोबर रहा. कायमचे राहिलात तर सर्वात भाग्यवान मुलगी मी असेन..


असे समजू नका की मी तुमचे ऋण फेडत आहे. कारण मला कायम तुमच्या ऋणातच रहायचे आहे...


खाली माझा ऑफीस व मोबाइल दोन्ही नंबर आहेत.

मला फोन करा सर..

वाट बघते आहे..

याल ना सर.........बाबा...?


तुमचीच, 


- आरती देसाई


पत्र वाचताना नानांचा आवाज कधी नव्हे ते कापरा झाला..

त्यांनी आप्पांकडे पाहिले..


आप्पा ते पाकिट छातीशी धरुन 

रडत होते...


शेवटी एवढेच म्हणेन  

माणसाचे अश्रू सांगतात तुम्हांला

            दुःख किती आहे.

संस्कार सांगतात कुटुंब कस आहे.

    गर्व सांगतो पैसा किती आहे.

   भाषा सांगते माणूस कसा आहे.

 ठोकर सांगते लक्ष किती आहे.

    आणि सर्वात महत्त्वाचे वेळ

       सांगते नात कस आहे..!