November 9, 2021

वो फिर नही आते


वो फिर नही आते

काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी…वो फिर नहीं आते…. आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. 

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही “मीच का?” या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी  हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं….. संपर्कात रहायला हवं. 

अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना ?…. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. 


ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियती नावाच्या देवीने आशिर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरुन वाटलेल्या. 


त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का ? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो …..  “वो फिर नहीं आते……” हि अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं “मी” पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो. 


गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर

पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं

वो बहारों के आने से खिलते नहीं

कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं

वो हजारों के आने से मिलते नहीं

उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम

वो फिर नहीं आते… 


माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं.

ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि.......

ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.

आँख धोखा है, क्या भरोसा है

दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है

अपने दिल में इसे घर बनाने न दो

कल तड़पना पड़े याद में जिनकी

रोक लो रूठ कर उनको जाने न दो

बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम

वो फिर नहीं आते… 


आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना….  नसेल तर…. खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल ...नाही का ? 

आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत..

शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.

उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्या   प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत  हीच ती  सुंदर माणसं.... तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी .. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची....

 सच कहा है किसीने...

...वो फिर नही आते....