एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली..
वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते.
गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते.
थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला , मी तर या जंगलाचा राजा आहे; माझा कोणी मालक नाही; मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची नाही.
वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.
थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता.
आता या कथेतून बोध हा आहे की,
गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे.
वाघ हे आपले अहंकारी मन आहे.
मालक हे ईश्वराचे प्रतीक आहे ,तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही अस्तित्वाची लढाई आहे.
कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही ,परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवते.