October 24, 2022

माझा आवडता संत - संत ज्ञानेश्वर MAJHA AAVDTA SANT SANT DNYANESHWAR






 माझा आवडता संत 

  संत ज्ञानेश्वर 

शक्तीच्या ऐलतीरावर भक्तीच्या पैलतीरावर पहुडलेल्या महाराष्ट्राला मानवतेच्या दिव्य प्रकाशाने तेजोमय करण्याचं काम एका तेजस्वी ज्ञानसूर्यानं केलं,हा ज्ञानसूर्य म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर होय.ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वी इथला भक्तीचा मार्ग फक्त उच्चवर्णीयांच्याच दरावरून जाट होता.तोच भक्तीचा मार्ग अधिक सोपा करून बहुजनांच्या घरापर्यंत नेण्याचे काम ज्ञानदेवांनी केले.वडील विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांनी प्रायश्चित म्हणून स्वतःचं आयुष्य संपवल्यावरही ,आळंदीकरांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा छळ थांबवला नाही.ज्या माणसांनी अनाथ ज्ञानदेवांच्या झोळीत 'भिक्षा'ही घातली नाही त्या माणसांच्या अज्ञानी झोळीत ज्ञानाचं भांडार ओतण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं.

 वर्णभेदाच्या आणि जातिभेदाच्या सीमारेषांमध्ये बंदिस्त असलेला तत्कालीन समाज मानवता विसरून गेला होता. अत्मोद्धाराचे सामर्थ्य असलेली ईश्वरभक्ती कर्मकांडाच्या चौकटीत बंदिस्त होती.अशा वेळी ज्ञानेश्वरांनी प्रवाहविरोधी भूमिका स्वीकारून महाराष्ट्राच्या मातीवर परिवर्तनाची पताका उभी केली.योग,कर्मकांड,दांभिकता यांसारख्या सामान्य माणसांना अशक्य असणाऱ्या गोष्टी नाकारून सर्वसामान्य माणसांसाठी 'हरिपाठाच्या'माध्यमातून नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग सांगितला.

बरे केले ज्ञानदेवा,सांगितला हरिपाठ ।

आम्हा साध्या माणसांना ,सोपा केला परिपाठ ।।

उच्चवर्णियांच्या गुलाबी ओठांवर खेळणाऱ्या 'संस्कृत' भाषेत ज्ञानाचे भंडार बंदिस्त होते.हे ज्ञान सर्वसामान्य  माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ,सर्व सामन्यांच्या गळी उतरवण्यासाठी ज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी' लिहिली.

" माझ्या आईच्या भाषेत,आहे ग्रंथ 'ज्ञानदेवी'

सांगे जीवनाचे सार ,तिची एक-एक ओवी."

सोपी भाषा,साधी उदाहरणे आणि दैनंदिन जीवनातील दाखले या साहित्य वैशिष्ट्यांचा विचार केला तर संत ज्ञानदेव फक्त 'संत'च नाही तर महान प्रतिभावंत वाटतात.

आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची बीजे सातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानदेवांच्या विचारात आढळतात."

पेरुनी नुसतीच हिंसा,उगवेल कशी अहिंसा.'

या भाषेत ज्ञानदेवांनी यज्ञात बळी देण्याच्या प्रथेला ,हिंसेला विरोध केला.

" योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी l वायाचि उपाधी दंभ धर्म अशा कर्मकांडाला ज्ञानदेवांनी विरोध केला.

सातशे वर्षांपूर्वी सर्व जातीधर्मातील संतांना एकत्र करून 'वारकरी संप्रदायाच्या' रूपाने त्यांच्या हातामध्ये ज्ञानदेवांनी समतेची पताका दिली.आजही ती पताका खांद्यावर घेऊन वारकरी सांप्रदाय साऱ्या देशाला शांतीचा व समतेचा संदेश देत पंढरीची वाट चालतो आहे. 

आजच्या भंगलेल्या समाजव्यवस्थेमध्ये ,दुभंगलेल्या मनांना जोडण्याचे सामर्थ्य ज्ञानोबांच्या अभंगांमध्ये आहे.आजही सारा महाराष्ट्र ज्ञानोबांना डोक्यावर घेऊन नाचतो आहे.खरं तर ; ज्ञानोबांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणे गरजेचे आहे.त्यांच्या नावाचा नुसता गजर करण्याऐवजी त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलाविले की नाही याला पुरावा नाही पण रेड्याप्रमाणे स्थूल झालेल्या सामान्य माणसांना बोलते करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही.ज्ञानदेवांनी दगडी भिंत चालवली की नाही ,हे निश्चित माहित नाही ,परंतु वर्णभेदाच्या चौकटीत भिताड झालेल्या माणसांना चालतं-बोलतं करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं हे नाकारता येणार नाही अशा या ज्ञानाच्या महासागराबद्दल बोलताना आपोआपच आपल्यासारख्यांना मर्यादा येतात आणि शब्द तुकोबांच्या शब्दांचा आधार घेतात.....

" ज्ञानियांचा राजा गृरू महाराव ,

म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे,

मज पामरा हे काय थोरपण ,

पायाची वहान पाया बरी ।।