पंडित जवाहरलाल नेहरू
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान
Pandit Jawharlal Neharu
First Prime Minister of India
प्रगल्भ बुद्धिमत्ता,प्रचंड श्रीमंती,ऐश्वर्यसंपन्न असणाऱ्या घरामध्ये ज्यांचा जन्म झाला,महात्मा गांधीजींनी ज्यांचा उल्लेख माझ्या विचारांचा वारसदार म्हणून केला,ज्यांना संपूर्ण जगाने शांतिदूत ही पदवी बहाल केली,पंचशील तत्वाचे खंदे समर्थक ,अलिप्तावादी चळवळीचे प्रणेते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या महापुरुषाचे नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद या ठिकाणी झाला.पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे निष्णात कायदेपंडित म्हणून प्रसिद्ध होते.भारतातील उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपले उच्च शिक्षण लंडन येथे केले.1912 साली बरीस्टर पदवी प्राप्त करून भारतात आगमन केले.1916 साली कमला कौल यांच्याशी विवाह केला.1920 साली देशात राष्ट्रीय चळवळीचे वारे वाहत असताना सारा देश देशप्रेमावर एकत्र येत होता.परकीय सत्तेचा कडाडून विरोध करत होता.अशाच कालखंडात ब्रिटीशांच्या विरोधात देशात एक वातावरण निर्माण होत होते.या कालखंडात नेहरूंनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीत उडी घेतली.1921 साली प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा भारतात येणार होता तेव्हा त्याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला.तेव्हा त्यांना सहा महिने तुरुगांची शिक्षा भोगावी लागली.1930 साली गांधीजीसमवेत मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले.1936 , 1937 च्या या दोन्ही कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.
1942 साली देशात 'चले जाव' चा नारा मोठ्या प्रमाणात दिला.देशातून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.तेव्हा नेहरू व त्यांच्या सहकाऱ्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात डांबले.तुरुंगात असताना त्यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' नावाचा ग्रंथ लिहिला.1945 साली त्या ग्रंथाचे प्रकाशन केले.1947 साली देशात चळवळीचे वारे वाहत होते.अशाच कालखंडात ब्रिटीशानी भारतीय सत्ता भारतीयांना दिली.15 ऑगस्ट 1947 ची पहाट उगवली.महापुरुषाच्या प्रयत्नाने स्वातंत्र्याच्या चळवळीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले.
15 ऑगस्टला पंडित नेहरूंनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्राला अभिप्रेत असणारे भाषण करताना पंडित नेहरू म्हणाले ." मला हा देश शेतकरी,कष्टकरी,श्रमिक यांच्या प्रयत्नातून व बुद्धीजीवी लोकांच्या कल्पनेतून साकार करावयाचा.त्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे.नेहरूंचे हे भाषण सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारे होते." पुढे नेहरू असे म्हणाले, या देशामध्ये हरित क्रांती करून भारतीय शेती शेतकऱ्याचा विकास करावयाचा आहे. आणि शेतकऱ्याचा विकास करून मला भारताला सक्षम देश उभा करावयाचा आहे.असेच सक्षम भारत निर्माण करण्यासाठी नेहरूंनी प्रामुख्याने प्रयत्न केले.मुला-फुलांचे नेहरू ......... चाचा नेहरू ...चाचा नेहरू!
आजही नेहरूंचा जन्मदिवस साजरा करताना आपण बालदिन म्हणून साजरा करतो.पंडित नेहरुंना लहान मुले फार आवडत असत.याच बालकातून उद्याच्या तरुणांची निर्मिती होणार आहे.बालकांच्यासमोर सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून उद्याच्या राष्ट्राची निर्मिती त्यांच्या हातातूनच होणार आहे हा विचार आमच्यासमोर ठेवण्याचे कार्य जवाहरलाल नेहरूंनी केलेले पहावयास मिळते.
1955 - रशियाचा दौरा.
1957 - दुसऱ्यांदा पंतप्रधान.
1960 - महाराष्ट्र राज्य स्थापनेत नेहरूंचे योगदान.
शेजारी असणाऱ्या राष्ट्रांना वेळोवेळी भेट देऊन त्या राष्ट्रांना सहकार्य करण्याची भावना नेहरूंच्यामध्ये होती.
तिसऱ्या जगाचा शोध घेणारे नेहरू जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती राष्ट्राच्या नुकसानीस जबाबदार असते.यासाठी त्यांनी अलिप्ततावाद चळवळीची स्थापना केली.बेलग्रेड येथे 1961 साली सहभाग घेतला.1962 साली पुन्हा पंतप्रधानपदी पंडितजींची निवड झाली.देशाला हरितक्रांतीच्या दिशेने नेण्यासाठी वेगवेगळ्या जागतिक पातळीवरची योजना अंमलात आणल्यामुळे माणुसकी व मानवतेचा स्वीकार करणारा आधुनिक शांतीदूत म्हणून नेहरूंचा उल्लेख केला जातो.नेहरू हे जितके हळवे आणि संयमी होते तितकेच ते स्पष्टवक्तेही होते.भारतीय लोकशाहीचे नेतृत्व करताना ,देशातील सर्वोच्च पदी असताना ,देशात शांतता प्रस्थापित करताना सनदशीर मार्गांनी वल्लभभाई पटेल तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आणि संरक्षण मंत्र्यांच्या मदतीने सर्व संस्थानांचे विलीनीकरणा योग्य पद्धतीने करून घेतले.देशातील अराजकता ,फुटीरता नष्ट करण्यासाठी शांतता हेच एकमेव मध्यम आहे हे जनतेच्या आणि संस्थानिकांच्या लक्षात आणून दिले.
उत्तम पालक आणि उत्तम प्रशासक यांचे दर्शन नेहरूंच्या पत्र लिखाणातून पाहावयास मिळते.1930 ते 1955 या कालखंडात आपल्या बहिणीला लिहिलेली पत्रे त्याचबरोबर तुरुंगात असताना आपल्या मुलीला केलेला पत्रव्यवहार आजही एक आदर्श पत्र म्हणून पहावयास मिळतात.प्रतिभासंपन्न नेहरूंचे दर्शन या पत्रातून पाहावयास मिळते.सार्वजनिक जीवनात लढा देणारा आणि तुरुंगवासाची शिक्षा भोगणारा माणूस हळव्या मनाचाही असतो यांचे दर्शन त्यांच्या या पत्रातून होते.
आजही नेहरू 'मनमिळावू नेहरू' म्हणून त्यांच्या विचारांची प्रचिती पाहावयास मिळते.महालामध्ये रममाण होण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेत सामील होऊन स्वातंत्र्याची पताका खांद्यावरती घेणारा एक झंझावाती तरुण म्हणजे नेहरू.देशातील निरक्षरता,अज्ञान,परंपरा,रूढी नष्ट करून वैज्ञानिक दृष्टीकोनाला साद घालणारा ,विज्ञानाची गीतं गाणारा हा महामानव खऱ्या अर्थाने 'आधुनिक भारताचे शिल्पकार'च आहेत.त्यांचाच जन्मदिन आपण बालदिन म्हणून साजरा करतो.