November 14, 2022

जननायक बिरसा मुंडा






 नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, आज आपण जननायक बिरसा मुंडा यांची माहिती पाहणार आहोत.

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी सुगाना व करमी या आदिवासी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलिहातू हे रांचीजवळ आहे.


बिरसाचे आई-वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता.


तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन-कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या


विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. १८९४ साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले.


तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. 'उलगुलान' म्हणजे एकाचवेळी सर्वांगीण उठाव.


१८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या. ब्रिटिशांना जेरीस आणले; परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही.


१८९८ मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे ४०० आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

सन १९०० मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे ९ जून १९०० रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले.


या वीराने आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना 'जननायक' हा किताब बहाल केला.