November 30, 2022

वाक्प्रचार - अर्थ व वाक्यात उपयोग

 










वाक्प्रचार : अर्थ व वाक्यात उपयोग यांसहित

हृदयाला स्पर्श करणे - अंतर्मनाला जाणवणे.

घरातून निघताना बाबांचे बोलणे सुरेशच्या हृदयाला स्पर्श करून गेले.

हेका धरणे - आग्रह धरणे , हट्ट करणे.

मला शाळेला जायचेच आहे ,असा राधाने हेका धरला .

हीव भरणे - घाबरून अंग थरथरणे.

समोर वाघ बघताच मुलांना हीव भरून आले .

हायसे वाटणे - समाधान होणे  ,बरे वाटणे.

परीक्षेला वेळेवर पोहोचल्यामुळे गीताला हायसे वाटले .

हातभार लावणे - मदत करणे.

वनिता आईला घरगुती कामात हातभार लावते .

हबकून जाणे - घाबरणे.

पहिल्यांदाच आकाश पाळण्यात बसलेल्या संजूचा जीव हबकून गेला .

हट्ट करणे - आग्रह धरणे.

विकासने सहलीला जाण्यासाठी बाबांकडे हट्ट केला .

सुसाट पळत सुटणे  - जोरात पळून जाणे.

वाघाला पाहून सानिका सुसाट पळत सुटली .

सुन्न होणे  - बधिर होणे .

घर अचानक कोसळल्यामुळे शामराव सुन्न झाले .

सुगावा लागणे - शोध लागणे .

लपून बसलेल्या चोरांचा अखेर पोलिसांना सुगावा लागला .

साद घालणे - हाक मारणे.

आईने लहानग्या सदूला जेवणासाठी साद घातली .

3333



साकार होणे  - प्रत्यक्षात येणे  .

धावण्याच्या शर्यतीत पहिले येण्याचे विनायकचे  स्वप्न अखेर साकार झाले .

संभ्रमात पडणे - निर्णय घेता न येणे.

दहावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा या बाबतीत सोहम संभ्रमात पडला .

संधी मिळणे - मोका सापडणे .

शालेय समारंभात आपले मत मांडण्याची मुग्धाला संधी मिळाली .

सल्ला देणे - योग्य मार्गदर्शन करणे .

दररोज पहाटे उठून अभ्यास करण्याचा सरांनी मोहनला सल्ला दिला .

समजूत घालणे - समजावून सांगणे .

नवीन कपड्यांसाठी हट्ट करणाऱ्या विजयची आईने समजूत घातली .

शिरकाव करणे - आत घुसणे .

बंद असलेल्या साखरेच्या डब्यात मोठ्या शिताफीने मुंग्यांनी शिरकाव केला होता .

शंकेची पाल चुकचुकणे -मनात शंका निर्माण होणे .

छत्री न घेता बाहेर पडलेल्या संजूच्या मनात पाऊस येईल की काय अशी शंकेची पाल चुकचुकली .

शब्दाला मोल येणे - शब्द महत्वाचा ठरणे.

ऐन संकटाच्या वेळी थोरामोठ्यांच्या शब्दाला मोल येते .

शब्द पचनी पडणे - मनापासून समजणे ,कळणे .

बाईंनी सांगितलेला एक-एक शब्द वरदच्या पचनी पडल्यामुळे त्याला चांगले गुण मिळाले .

वेठीस धरणे - अडवून ठेवणे , बांधून ठेवणे .

आपल्या स्वार्थासाठी कुणालाही वेठीस धरणे योग्य नाही .

विळखा घालणे - चोहोबाजूंनी गच्च आवळणे .

पोट भरल्यावर अजगर झाडाला करकचून विळखा घालतो .

विशद करणे  - समजावून सांगणे .

बाईंनी  आम्हाला कवितेचा भावार्थ विशद केला .

विल्हेवाट लावणे - नाहीसे करणे .

सदूने आपल्या व्यसनापायी घरादाराची विल्हेवाट लावली .

विराजमान होणे - स्थानापन्न होणे , आसनावर ऐटीत बसणे.

महाराज आपल्या सिंहासनावर विराजमान झाले .

विजेच्या गतीने नाहीसे होणे - झटकन दिसेनासे होणे.

गावाच्या सीमेवर दिसलेला वाघ विजेच्या गतीने नाहीसा झाला .

वारे वाहू लागणे - विशिष्ट गोष्टीचे आगमन होणे.

आता सर्वत्र ४ जी मोबाईलचे वारे वाहू लागले आहेत .

वाया जाणे - फुकट जाणे , अपव्यय होणे .

लग्न समारंभात अन्न फुकट वाया जाते .

वाण नसणे - कमतरता नसणे .

रामराव तात्या इतके श्रीमंत होते की त्यांना कोणत्याच गोष्टींची वाण नव्हती .

वाटेला लागणे - मार्गाने जाणे , चालू लागणे .

पहाट होताच सर्व यात्रेकरू वाटेला लागले .

लौकिक वाढणे - कीर्ती पसरणे .

उज्ज्वल यश संपादन करून सुलभाने आईवडिलांचा लौकिक वाढवला .

लुप्त होणे - गायब होणे , नाहीसे होणे .

भारतातून गिधाड हा पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे .

लढा देणे - संघर्ष करणे , संग्राम करणे .

भारतीय क्रांतिकारकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध प्रखर लढा दिला .

रंग चढणे - आनंदाने अत्युच्च शिखर गाठणे.

मुलांनी स्नेहसंमेलनात सादर केलेल्या नाटकाला उत्तरोत्तर रंग चढला .

रस नसणे - आवड नसणे .

रमेशला अभ्यासात अजिबात रस नाही .

युक्ती फळाला येणे - युक्ती सफल होणे .

नानाकाकांनी शेतातील उंदीर पकडण्यासाठी शोधून काढलेली युक्ती फळाला आली .

मेटाकुटीला येणे - हैराण होणे , खूप त्रासणे. 

दिवसरात्र काम करून केशवचा जीव मेटाकुटीला आला .

मुक्या शब्दांचा मार देणे - न बोलता समज देणे .

काम न करणाऱ्या मनिषकडे बाबांनी नुसता एक कटाक्ष टाकून मुक्या शब्दांचा मार दिला .

भावनांचे मोहोळ चेतवणे - भावना जागृत करणे .

अभ्यास करण्यासाठी सरांनी विजयच्या भावनांचे मोहोळ चेतवले .

भास होणे -भ्रम होणे.

एकाकी रस्त्यातून जाताना कुणीतरी आपल्या मागून येत आहे , असा कार्तिकला भास झाला .

भुरळ घालणे -भूल घालणे , मोहवून टाकणे.

मधुराने काढलेल्या रांगोळीने तनिष्काच्या मनाला भुरळ घातली .

भ्रमंती करणे -भटकंती करणे , फिरणे .

मुलांनी भर उन्हात संपूर्ण जंगलात भ्रमंती केली .

मती कुंठीत होणे -बुद्धी न चालणे .

रात्री दुर्बिणीतून आकाशातील ग्रहताऱ्यांचे निरीक्षण करताना आपली मती कुंठीत होते .

मदतीला धावून जाणे - तत्परतेने मदत करणे .

दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे हा मानवधर्म आहे .

मन हेलावणे -गलबलून जाणे .

आईच्या आर्त बोलांनी रोहिणीचे मन हेलावून गेले .

मनात उलघाल होणे -चलबिचल होणे .

आई आजारी असताना आपण सहलीला जावे की नाही , याची चंदूच्या मनात उलघाल झाली .

मनात काहूर उठणे -मनात विचारांचे वादळ येणे .

पतीच्या अपघाती निधनामुळे श्रुतीच्या मनात काहूर उठले .

मनात घर करणे -मनात रुतून बसणे .

रुपालीच्या शालीन सौंदर्याने दीपालीच्या मनात घर केले .

मनात घिरट्या घालणे - एखादा विचार मनात फिरत राहणे ,विचारचक्र फिरणे.

सकाळी वर्तमानपत्रात वाचलेली बातमी मधूच्या मनात दिवसभर घिरट्या घालत होती .

मनोमन ठरवणे -मनाशी पक्के करणे .

या वर्षी नियमित अभ्यास करण्याचे आदित्यने मनोमन ठरवले .

मागमूस नसणे -माहित नसणे , पत्ता नसणे ,अस्तित्व नसणे.

जून महिना सरला तरी अजूनही पावसाचा पत्ता नव्हता .

माघारी फिरणे -परत जाणे / येणे .

सकाळी शेताला गेलेले आईबाबा संध्याकाळीच माघारी फिरले .

मान खाली घालून बसणे -नाराज होणे .

सहलीला जायला मिळाले नाही म्हणून अभय मान खाली घालून बसला होता .

मान डोलावणे -संमती देणे , होकार देणे .

नेत्याच्या सूचनेवर सर्व कार्यकर्त्यांनी माना डोलावल्या .

पान न हलणे -च्याशिवाय काम न होणे .

घरातील कोणत्याही कामात आईशिवाय पान हलत नाही .

पाय जमिनीवर असणे -वास्तवाचे भान ठेवणे .

कितीही उज्ज्वल यश संपादन केले तरीही माणसाचे पाय जमिनीवर असावेत .

पारखे होणे -वंचित राहणे , न मिळणे .

आईच्या अकाली मृत्यूमुळे मोहन मायेला पारखा झाला होता .

पारध होणे -शिकार होणे .

शिकाऱ्याने अचूक नेम साधल्यामुळे जंगलात हरिणाची पारध झाली .

पाश सोडणे -बंधनातून मुक्त होणे .

मोह , माया यांचे पाश सोडणे मनुष्याला जमले पाहिजे .

पुरते झपाटणे -च्या प्रभावाखाली येणे .

नवीन युवा पिढीला इंटरनेटने पुरते झपाटले आहे .

प्रचार करणे -जाहीरपणे बोलबाला करणे .

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रूपेशने आपल्या गटाचा जोरात प्रचार केला .

प्रतीक्षा करणे -वाट बघणे .

शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करतात .

प्रदर्शन मांडणे -दाखवणे , जाहीर करणे .

विद्यार्थ्यांनी शाळेत विविध प्रयोगांचे प्रदर्शन मांडले .

प्रयत्नांची पराकाष्ठा करणे -आटोकाट प्रयत्न करणे .

उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते .

प्रशंसा करणे -स्तुती करणे , कौतुक करणे .

धावण्याच्या शर्यतीत शरयू पहिली आली म्हणून सर्वांनी तिची प्रशंसा केली .

प्रोत्साहित करणे -उत्तेजन देणे .

प्रतीकच्या अभ्यासाचे वेळापत्रक आखून बाबांनी त्याला प्रोत्साहित केले .

फुलवून सांगणे -एखादी गोष्ट रंगवून सांगणे .

गोष्ट छोटीशीच पण आजी आम्हाला ती फुलवून सांगत असे .

बला जाणे -संकट टळणे .

येणारा वादळी पाऊस टळल्यामुळे आजी म्हणाली , “बरे झाले , बला गेली  .

बाजी मारणे -जिंकणे , डाव जिंकणे .

अटीतटीच्या कबड्डीच्या सामन्यात आमच्या शाळेच्या संघाने बाजी मारली .

बेजार करणे -हैराण करणे , त्रास देणे .

प्रतीकने उंदराला पिंजऱ्यात पकडून बेजार केले .

भंग करणे -मध्येच खंडित करणे .

मध्येच काहीतरी बोलून राजूने ध्यानाला बसलेल्या सर्वांची समाधी भंग केली .

भंडावून सोडणे -हैराण करणे .

मला या दिवाळीत कपडे हवेच असे म्हणून हर्षदने बाबांना भंडावून सोडले .

पाठपुरावा करणे -सतत मागोवा घेणे .

कोणत्याही कामाचा पाठपुरावा केल्यामुळेच ते काम यशस्वी होते .

पळ काढणे -पळून जाणे .

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोराने पळ काढला .

पर्वा करणे -काळजी करणे , तमा बाळगणे .

दुसऱ्यांच्या चांगुलपणाची पर्वा करणे नेहमीच चांगले  .

 

 


पर्वणी वाटणे - आनंददायी मन:स्थिती असणे .

कलामहोत्सवाचे आयोजन गावात केल्यामुळे गावकऱ्यांना ती पर्वणी वाटली .

पदरात पाडून घेणे - स्वतःला मिळेल अशी व्यवस्था करणे

जे ज्ञान मिळेल , ते पदरात पडून घेणे इष्ट आहे .

नेमणूक होणे -निवड होणे .

सरांनी आदर्शची वर्गप्रमुख म्हणून नेमणूक केली .

निरोप ठेवणे - सांगावा देणे , आमंत्रण देणे .

उद्या पूजेला या , असा सुरजने आम्हाला निरोप ठेवला होता .

नायनाट करणे - नष्ट करणे , नाश करणे .

स्वच्छता अभियानामुळे रोगराईचा नायनाट करण्यात आला .

नशीब खोटे असणे - दैव खराब असणे , नशीब फुटके असणे .

तिसऱ्यांदा घर कोसळले म्हणजे हर्षदचे नशीबच खोटे आहे .

नशिबात वाढून ठेवणे - वाट्याला येणे .

कुणाच्या नशिबात काय वाढून ठेवलेले असते ,हे कोणालाच माहित नसते .

नजरेत सामावून येणे - हृदयात साठवणे .

मैदानावरील सचिन तेंडूलकरच्या खेळीला हजारो प्रेक्षकांनी नजरेत सामावून घेतले .

नजर चुकवणे - पाहायचे टाळणे .

उत्तर येत नाही म्हणून रोहित सरांची नजर चुकवत होता .

नजर खिळणे  - नजर एका जागी स्थिर होणे

बागेतील त्या सुंदर फुलावर माधुरीची नजर खिळली .

नखशिखान्त न्याहाळणे - आपादमस्तक नीट पाहणे .

ताराबाईने घरात प्रवेश करणाऱ्या आपल्या मुलीला नखशिखान्त न्याहाळले .

धडकी भरवणे - घाबरून सोडणे .

जंगलातून बाहेर आलेल्या वाघाने सर्वांच्या उरात धडकी भरवली .

दिवस माथ्यावर येणे - भर दुपार होणे .

शेतात काम करताना दिवस माथ्यावर कधी आला ते रामरावांना कळलेच नाही .

दातखिळी बसणे - घाबरून बोलता न येणे .

खूप घाबरल्यामुळे निकिताची दातखिळी बसली .

दाखल होणे - प्रवेश घेणे .

सोहम इयता पहिलीत दाखल झाला .

दरदरून घाम फुटणे - खूप घाबरणे .

मध्यरात्री जंगलातून प्रवास करताना रामरावांना दरदरून घाम फुटला .

दबा धरून बसणे - हल्ला करण्यासाठी लपून बसणे .

शत्रूवर हल्ला करण्यासाठी शिवरायांचे मावळे जंगलात दबा धरून बसले .

दबदबा वाढणे - दरारा वाढणे ,वर्चस्व वाढणे .

चांगल्या कार्यामुळे दामोदरपंतांचा गावात दबदबा वाढला .

थंडीने अंग काकडणे - थंडीने अंग गारठणे .

आज थंडी एवढी पडली की , एवढ्या थंडीने सर्वांचे अंग गारठले .

थक्क होणे - आश्चर्यचकीत होणे .

पहिलीत शिकणाऱ्या पल्लवीचे नृत्य पाहून सर्वजण थक्क झाले .

त्याग करणे - सोडून देणे

देशभक्तांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेताना आपल्या सर्वस्वाचा त्याग केला  .

तोंडून शब्द न फुटणे - बोलती बंद होणे ,बोलता न येणे .

बुडता बुडता वाचल्यामुळे सोहन एवढा घाबरला होता की ,त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता .

तोंड वेडावणे - चिडवणे , नाराजी व्यक्त करणे .

ताईने राजूचा खाऊ घेतला म्हणूने राजूने तोंड वेडावले .

तोंड उघडणे - बोलायला सुरुवात करणे .

पोलिसांचा मार बसताच चोराने  तोंड उघडले .

तुच्छ लेखणे - एखाद्याला कमी दर्जाचे समजणे .

विजूने कितीही चांगले काम केले तरी दिनू त्याला नेहमी तुच्छ लेखतो .

तांबडं फुटणे - पहाट होणे .

बाबा तांबडं फुटायच्या वेळेला शेतात गेले .

ताव मारणे - भरपूर जेवणे .

लग्नसमारंभात सर्व व्हाराडींनी जेवणावर ताव मारला .

तल्लीन होणे - गुंग होणे , मग्न होणे , रंगून जाणे .

पुस्तक वाचताना सायली तल्लीन होऊन वाचत होती .

तत्पर असणे - लगेच तयार असणे .

संकटग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असावे .

तर्क करणे - अंदाज लावणे , अनुमान लावणे .

पाऊस कधी पडेल याविषयी गावकरी तर्क करू लागले .

डोळे मिचकावणे - खोडसाळपणे  इशारा करणे .

दिशाला उगाचच डोळे मिचकावत बोलण्याची सवय आहे .

डोळे पाण्याने भरणे - रडवेले होणे ,रडू येणे .

मुलाला निरोप देताना आईचे डोळे पाण्याने भरले .

डोक्याला हात लावणे - हताश होणे .

पुरात घर वाहून गेल्यामुळे काशिनाथने डोक्याला हात लावला .

डावपेच आखणे - चढाईच्या चाली  तयार करणे .

कबड्डी खेळताना यू मुंबाचे खेळाडू चांगले डावपेच आखतात .

ठेका घेणे - बाजू  घेणे , कंत्राट घेणे .

अमित कसाही वागला तरी आई त्याचाच ठेका घेते .

ठणकावून सांगणे - ठामपणे जोरात सांगणे .

जास्त पॉकेटमनी  मिळणार नाही , असे सुशीलला बाबांनी ठणकावून  सांगितले .

टक्कर देणे - सामना करणे , तोंड देणे .

क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्याला छान टक्कर   दिली .  

टक लावून पाहणे - एकाच गोष्टीकडे सतत पाहणे .

शारंधर शेतात गेलेल्या आईच्या वाटेकडे  टक लावून बसला होता .

झुंजूमुंजू होणे - पहाट होणे .

रात्रीचा अंधार सरला नि झुंजूमुंजू  झाले .

झुंज देणे - सामना करणे ,लढा देणे .

कारगिल युद्धात भारतीय सेनेने शेवटपर्यंत झुंज दिली .

टकामका पाहणे - लक्ष पूर्वक पहाणे .

लहान बाळ त्या अजब खेळण्याकडे  टकामका पाहत राहिले .

झडप घालणे - झेप घेणे .

दबा धरून बसलेल्या पोलिसांनी चोराला पकडण्यासाठी झडप घातली .

जीवात जीव येणे - बरे वाटणे ,हायसे वाटणे .

अपघात होता होता बचावलेल्या प्रवाशांच्या जीवात जीव आला .

जीभ चाचरणे   - बोलताना अडखळणे .

सरांसमोर आपला गुन्हा कबूल करताना  अथर्वची जीभ चाचरली .

जादूची कांडी फिरणे - चमत्कार होणे .

खोडसाळ प्रथमेशच्या स्वभावात जादूची कांडी फिरावी तसा बदल झाला आहे.

छाप पाडणे - ठसा उमटणे ,प्रभाव पाडणे .

स्नेहसंमेलनाला उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणाने श्रोत्यांवर छाप पाडली .

चोरट्या नजरेने पाहणे - गुपचूप पाहणे .

लग्नात आदर्श आपल्या नवरीकडे चोरट्या नजरेने पाहत होता .

चेहरा खुलणे - मुखावर आनंद दिसणे.

बाबांनी खाऊ आणलेला पाहून छोट्या पिंकीचा चेहरा खुलला .

चुळबुळ करणे - अस्वस्थपणे हालचाल करणे .

बाईंनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नसल्यामुळे रमेश चुळबुळ करू लागला .

चाहूल घेणे - अंदाज घेणे .

डोहात उडी मारण्याअगोदर रूपेशने पाण्याच्या खोलीची चाहूल घेतली .

चरकणे - धक्का बसून घाबरणे .

अचानक वाटेत साप आलेला पाहून मयूर मनात चरकला .

घासाघीस करणे - वस्तूचा दर कमी जास्त करण्यासाठी चर्चा करणे .

बाजारात गेल्यावर बाबा नेहमी दुकानदाराशी वस्तूंच्या किमतीबद्दल घासाघीस

करतात .

घालमेल होणे - मन अस्वस्थ होणे .

नोकरीच्या निमित्ताने परदेशी जाताना सुदेशच्या मनाची घालमेल झाली .

घाबरगुंडी उडणे - घाबरल्यामुळे गोंधळून जाणे .

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मधुराची घाबरगुंडी उडाली .

गौरव करणे - सन्मान करणे .

वक्तृत्व स्पर्धेत कार्तिकने प्रथम क्रमांक पटकावला म्हणून शाळेतर्फे त्याचा गौरव करण्यात आला .

गिळंकृत करणे - गिळणे .

अजगर खूप भुकेला असला की , गाईच्या वासराएवढे प्राणीसुद्धा गिळंकृत करतो .

गिल्ला करणे - गोंधळ करणे ,आरडाओरडा करणे .

शाळेला सुट्टी असल्यामुळे अंगणात खेळताना मुलांनी एकच गिल्ला केला .

गांगरणे - गोंधळणे .

मुलांच्या अंगावर अचानक थंडगार पाणी पडल्यामुळे सर्व मुले गांगरली .

गालातल्या गालात हसणे - स्मितहास्य करणे .

बाईनी अनिताचे कौतुक केले ,तेव्हा ती गालातल्या गालात हसत होती .

गाडी रुळावर येणे - पुन्हा व्यवस्थित होणे .

तीनदा नापास झाल्यानंतर या वर्षी सागरची गाडी रुळावर आली .

गहिवरून येणे - भावनेने गलबलून येणे .

मुलीला सासरी पाठवताना आईचे  मन गहिवरून आले .

गहिवर  येणे - हृदय भावनेने उचंबळणे  .

मुलीला सासरी पाठवताना आईच्या मनात गहिवर आला .

गराडा पडणे - घेराव पडणे .

सैन्यदलात सेवेत असलेला विजय खूप दिवसांनी गावी आल्यावर गावकऱ्यांचा त्याच्याभोवती गराडा पडला .

खो घालणे - अडथळा आणणे .

गावात नवीन योजना सुरु करण्याच्या गावकऱ्यांच्या विचाराला सरपंचानी खो घातला .

खो-खो हसणे - मोठया आवाजात हसणे .

शालेय परिपाठात निलेशने सांगितलेल्या विनोदावर सर्व मुले खो-खो हसू लागली .

खुटून बसणे - रुसून बसणे .

नवीन सायकल मिळाली नाही म्हणून रितेश खुटून बसला .

खलबते चालणे - दीर्घकाळ चर्चा होणे .

भारतीय सैनिकांच्या छावणीमध्ये शत्रूवर चढाई करण्याच्या दृष्टीने रात्रभर खलबते चालू होती .

काळीज धडधडणे - घाबरल्यामुळे हृदय धडधडणे .

पहिल्या दिवशी परीक्षेला जाताना रूपालीचे काळीज धडधडत होते .

काळीज काढून देणे - प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे .

आईचे मुलावर इतके प्रेम असते की ती त्याला प्रसंगी काळीज काढून देते .

काळजात धस्स होणे - घाबरल्यामुळे धक्का बसणे .

अचानक एस.टी.बसच्या समोर ट्रक आल्यामुळे प्रवाशांच्या काळजात धस्स झाले .

कार्यरत असणे - कामात मग्न असणे .

विद्यार्थ्यानी नेहमी कार्यरत असावे .

कानावर घालणे - झालेली हकीकत सांगणे .

वर्गात घडलेला प्रसंग तनिष्काने आईच्या कानावर घातला .

कापरे भरणे - घाबरून अंग थरथरणे .

वाटेत अचानक वाघ आल्यामुळे शेतकऱ्याला कापरे भरले .

कळकळ असणे - तळमळ असणे ,आस्था असणे .

साने गुरुजींना बालकांविषयी खूप कळकळ होती .

कवेत अंबर घेणे - अशक्य गोष्ट शक्य करणे .

धावण्याच्या शर्यतीत १०० मीटर अंतर १० सेकंदात पार करून स्वातीने जणू अंबर कवेत घेतले .

करुणा भाकणे - प्रार्थना करणे .

कोरोना व्हायरसचे संकट दूर व्हावे म्हणून लोकांनी ईश्वराची करुणा भाकली .

कणव निर्माण होणे - दया येणे .

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गरीब मुलाला पाहून गीताच्या मनात त्याच्याबद्दल कणव निर्माण झाली .

उलगडा न होणे - अर्थ न समजणे .

सरांनी विचारलेल्या प्रश्नाचा चंदुला उलगडा झाला नाही .

उभारी येणे - उमेद येणे ,उत्साह वाटणे .

सरांनी मार्गदर्शन केल्यामुळे सुधाला अभ्यास करण्यासाठी उभारी आली .

उदरनिर्वाह करणे - पोट भरणे .

दिवसभर काबाडकष्ट करून अनेक लोक आपला उदरनिर्वाह करतात .

उत्साह द्विगुणीत करणे - खूप उत्साह वाढवणे .

शिक्षकांनी केलेल्या कौतुकामुळे अभ्यास करण्याचा दिपकचा उत्साह द्विगुणीत झाला .

उत्कंठा वाढणे - उत्सुकता निर्माण होणे .

जिंकण्यासाठी सहा धावांची आवश्यकता असताना आता कोण जिंकणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा वाढली . 

उच्चाटन करणे - उखडून टाकणे .

अनिष्ट रुढींचे उच्चाटन करणे हे आपले कर्तव्य आहे .

आश्चर्य वाटणे - नवल वाटणे ,चकित होणे .

भाषणाच्या स्पर्धेत मितालीने पहिला क्रमांक मिळवला याचेच सर्वाना आश्चर्य वाटले .

आश्चर्याचा धक्का बसणे - अचानक चकित होणे .

भर उन्हाळ्यात जोराचा पाऊस सुरु झाल्यामुळे गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला .

आशाळभूत नजरेने पाहणे - केविलवाणे होणे .

त्या पंचपक्वानाच्या जेवणाकडे उपाशी मुलगा आशाळभूत नजरेने पाहत होता .

आयुष्यातून उठणे - मरण पावणे .

ऊसाला लागलेल्या आगीत होरपळून एक शेतकरी कायमचा आयुष्यातून उठला .

आभार मानणे - धन्यवाद देणे .

कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे मुख्याध्यापकांनी आभार मानले .

आबाळ होणे - नीट देखभाल न होणे .

आईवडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्यामुळे संजूची खूपच आबाळ झाली .

आपुलकी निर्माण होणे  - प्रेम वाटणे .

दोनच दिवसांपूर्वी घरी  आणलेल्या कुत्र्याच्या पिलाबद्द्ल सर्वांच्या मनात आपुलकी निर्माण झाली .

आनंदाला पारावार न राहणे - खूप आनंद होणे .

वैशालीचा वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक आला ,तेव्हा तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही .

आडवे येणे - बंधन घालणे , नकार देणे .

गावात होणाऱ्या विकासकामात काही विघ्नसंतुष्ट लोक आडवे आले .

आगेकूच करणे - पुढे जाणे .

भारतमातेचा जयघोष करत भारतीय सैन्याने आगेकूच केली .

अंमल चढणे - च्या गुंगीत असणे ,अधीन होणे .

आजच्या तरुण पिढीवर मोबाईल वापराचा अंमल चढला आहे .

अभाव असणे - कमतरता असणे .

दुसऱ्यांचे शांतपणे ऐकून घेणे याचा रवीकडे अभाव आहे .

अनुमती दर्शवणे - परवानगी असणे .

मामाच्या गावी सुट्टीला जाण्यासाठी सिद्धीला बाबांनी अनुमती दिली .

अतिक्रमण करणे - बळेबळेच चढाई करणे .

शत्रूपक्षाने सीमेवर अतिक्रमण केले .