November 28, 2022

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज




लोकराजा राजर्षी

छत्रपती

शाहू महाराज 

माहितीपट

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या शैक्षणिक ,सामाजिक व आर्थिक कार्याच्याद्वारे बहुजन समाजाला जागृत करून त्यांची सर्वांगीण क्षेत्रात प्रगती घडवून आणणारे प्रजाहितदक्ष सत्ताधीश म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होत.

विचारपूर्वक स्वीकारलेल्या सामाजिक किंवा राजकीय तत्वांच्या बाबतीत कोणतीही तडजोड न स्वीकारता ,या तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले असामान्य मानसिक धैर्य छत्रपती शाहू महाराजांजवळ होते.  त्यांच्या कार्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व केवळ कोल्हापूर संस्थानापुरतेच मर्यादित न राहता , अखिल महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही लोकप्रिय झाले .

एक आदर्श राजा ,बहुजन समाजाचा नेता म्हणून असलेली त्यांची लोकप्रियता शेवटपर्यंत कायम टिकली .सर्वसामान्य माणसाचे कल्याण करणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले व सर्व समाजालाही या कर्तव्याच्या अनुरोधाने मार्गदर्शन केले .

या काळात महाराष्ट्रात उच्च मानल्या गेलेल्या जातीने आपले सर्वांगीण वर्चस्व निर्माण केले होते व हे वर्चस्व टिकविण्यासाठी बहुजन समाजावर निरनिराळी सामाजिक व धार्मिक बंधने लादलेली होती .या बंधनांतून बहुजन समाजाची सुटका करून ,त्याला सुशिक्षित बनविण्याचे ,जागृत करण्याचे व प्रगत बनविण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले .

आपल्या या कार्याविषयी होणारी प्रचंड टीका त्यांनी निर्भयपणे सहन केली ,पण आपल्या ध्येयधोरणात व कार्यपद्धतीत बदल केला नाही .त्यांच्या या कार्यामुळेच असामान्य व्यक्तिमत्वाचा बहुजन समाजाचा लोकनेता म्हणून त्यांना लोकप्रियता मिळाली .

गोरगरीबांचा ,दिनदलितांचा कनवाळू राजा म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे तेच

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज .

खरा तो एकचि धर्म

जगाला प्रेम अर्पावे .

हा छत्रपती शाहू महाराजांचा महामंत्र होता .

शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये झाला.कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांचे निधन झाल्यावर कोल्हापूरच्या गादीला राजा नव्हता .पुढे त्यांच्या पत्नीने दहा वर्षांच्या यशवंत घाटगे यांना दत्तक म्हणून घेतले .

महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागते .सर्वत्र अंधःकार ,अंधश्रद्धा ,अज्ञान ,अंधरूढी व सनातनवृत्ती या गोष्टींनी समाज पोखरला होता .त्याला यातून बाहेर काढण्याचे काम महाराजांनी केले .म्हणूनच शाहू महाराजांना सामाजिक कार्याचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाते .

त्यांचे अप्रतिम कार्य पाहून जनतेनेच त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली . महाराजांनी राज्यकारभार ,समाजोद्धार ,सांस्कृतिक प्रगती ,शिक्षण ,आर्थिक प्रगती ,सहकार याचबरोबर कला क्रीडा या क्षेत्रात भरीव कार्य केले .

व्यापक मानवतावादी दृष्टी व विलक्षण साहसी वृत्ती या दोन गुणांचा महाराजांच्या ठिकाणी समन्वय साधला गेला होता .

शिक्षणसंपन्न ,तेजस्वी ,खंबीर आणि समर्थ असे शाहू अज्ञान ,अंधश्रद्धा , दारिद्र्य या मानवाच्या तीन महान शत्रूंना नेस्तनाबूत करायला दंड थोपटून उभे राहिले .

व्यापक मानवतावादी दृष्टी व विलक्षण साहसी वृत्ती या दोन गुणांचा महाराजांच्या ठिकाणी समन्वय साधला गेला होता .

शिक्षणसंपन्न ,तेजस्वी ,खंबीर आणि समर्थ असे शाहू अज्ञान ,अंधश्रद्धा , दारिद्र्य या मानवाच्या तीन महान शत्रूंना नेस्तनाबूत करायला दंड थोपटून उभे राहिले .

माणसाला माणूस न म्हणणारी संस्कृती संस्कृतीच असू शकत नाही .यानेच बहुजन समाजाला लुळे करून सोडले . सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी साधन आहे .हे महात्मा फुले यांनी जाणले . महात्मा फुले यांनी प्रज्वलित केलेल्या बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या पणतीचे महाराजांनी महायज्ञात रुपांतर केले .

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून महाराजांनी ज्ञानगंगा दक्षिण काशीत आणली . या गंगेत सर्वसामान्यांना पवित्र करून सोडणारा व त्यांचा उद्धार करणारा महाराष्ट्राचा पहिला भगीरथ ठरला .राजवाडा किंवा सत्तासंपत्तीच्या राजस भूमीत विद्यार्जनाचे पवित्र रोप मुळीच तग धरत नाही . हे ओळखून

अंतरीचा उमाळा,सत्ता व संपत्ती या त्रिकुटीने महाराजांनी आकाशाला गवसणी घातली . बहुजन समाजाची सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा इ.स.१९०२ साली त्यांनी हुकुम काढला .हा शाहूंचा धाडसी निर्णय होता .

महाराजांचे जीवन म्हणजे एक प्रचंड धाडस होते .

धन्य धन्य तू शाहूराया

तुजसम राजा तूच एकला

तूच शिवाजी ,बुद्धदेव तू

तूच हरि सावळा .

जगात अनेक राजे जन्मले ,पण यासम हाच .

राजामध्ये ऋषी कुणी नव्हता किंवा ऋषीमध्ये राजा कुणी नव्हता .या दोन्हींचा संगम म्हणजे राजर्षी शाहू .

शाहू महाराज काय नव्हते ?

ते उपेक्षितांचे कैवारी होते ,क्रीडा व कलाप्रेमी होते .  तसेच शिक्षणप्रेमीसुद्धा होते .ते दलितांचे दाते तर मल्लांचे पोशिंदे होते .समाजाचा पाया घट्ट करणारे नवयुगातील राष्ट्रपुरुष होते .संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानाची कवाडे खुली करणारे ते ज्ञानाचा दीप होते .दलित ,अस्पृश्यतेचा मानवतेवरील कलंक पुसणारे ते महापुरुष होते .

गुणवंतांचे आश्रयदाते होते .नावाने यशवंत असणारे शाहू झाले .शाहूंचे ते राजर्षी झाले . असे त्यांचे महान कर्तृत्व होते .तेवढेच ते साधेही होते . म्हणूनच समाजाच्या दुःखाशी नाती सांगणार्ऱ्यांना  शतकांची कुंपणं अडवीत नाहीत .

शेतकऱ्यांना नांगर स्वस्त मिळावे म्हणून तोफा वितवळून नांगर करण्याचे आदेश दिले . .  शेतकरी सुखी तर ,जग सुखीही त्यांची मनोधारणा होती .असे  वैभवसंपन्न राजे  सामान्य लोकात वावरले  .सामान्यांच्या सारखे  जगले  .जनतेसाठी जगले  .

राजवैभवी राजे असूनसुद्धा राजे खंडू कांबळेच्या घोंगड्यावर झोपले .घोंगड्यालाच ते सिंहासन मानत असत .ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची झुणका भाकर त्यांनी खाल्ली . गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीला हॉटेल काढून दिले व स्वतः ते  चहा प्याले . शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर केल्या .

आत्मसुखाचा त्याग करून गरिबांच्या झोपडीतून ,शिवारातून फिरून दीन-दलितांचे अश्रू पुसत राहिले  .त्यांच्या स्वतःच्या महान कृतीने आणि युक्तीने ते समाजामध्ये लोकराजाच झाले .

अशा या लोकाराजाला

माझे त्रिवार अभिवादन !