November 6, 2022

गुरु नानकदेव मराठी निबंध Guru Nanakdev Marathi Nibandh

 



गुरु नानकदेव मराठी निबंध 

गुरु नानकदेव हे शिखांचे पहिले गुरु होते.त्यांचा जन्मदिवस गुरु नानक जयंती म्हणून साजरा केला जातो.हा सण शिखांचा सर्वात महत्वाचा सण आहे.गुरु नानक जयंती गुरूपर्व आणि प्रकाशपर्व म्हणूनही ओळखली जाते.

नानकांचा जन्म 1469 मध्ये कार्तिक पौर्णिमेला पंजाब (पाकिस्तान) प्रदेशातील रावी नदीच्या काठावर असलेल्या तलवंडी नावाच्या गावात झाला.हे ठिकाण आता पाकिस्तानात आहे.जे आता नानकांना साहिब म्हणून ओळखले जाते.नानकजींचा जन्म हिंदू कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव कल्याण किंवा मेहता काळूरामजी होते आणि आईचे नाव तृप्तीदेवी होते.

                 शिख याचा अर्थ शिष्य असा आहे.पंजाबी भाषेत त्याला 'सिख्ख' म्हणतात.शिख पंथात गुरूला फार महत्व आहे.त्यामुळे शिख धर्मातील सण,उत्सव हे त्यांच्या गुरुचे जन्मदिवस ,ज्ञानप्राप्तीचा दिवस तसेच निर्वाण या संदर्भातच आहेत.

        गुरुनानक हे शिख धर्माचे संस्थापक होते.त्यांच्या जयंतीला शिख धर्मात अतिशय महत्व आहे.कार्तिक पौर्णिमा हा नानकांचा जन्मदिवस .हा दिवस 'गुरुपरब' या नावाने सण म्हणून साजरा करतात.या दिवशी 'ग्रंथसाहिब' चे संपूर्ण वाचन केले जाते.या वाचनाला 'अखंड पंथ' असे म्हणतात.वाचन पूर्ण झाल्यावर ग्रंथसाहिबची मिरवणूक काढतात.

      नानकांच्या जन्माच्या वेळेला 'हा मुलगा छत्रधारी होईल,हिंदू व मुसलमान दोघांना प्रिय होईल' अशी भविष्यवाणी करण्यात आली होती.नानक लहानपणी अत्यंत अबोल व एकांतप्रिय होते.त्यांनी वडिलांच्या व्यवसायात कधीच लक्ष घातले नाही.संसारातही ते रमले नाहीत.नंतर त्यांनी घर सोडले.तीन दिवसांच्या एकांतात त्यांना वैना नदीच्या काठी ज्ञान मिळाले.त्यानंतर त्यांनी पाच वर्षे यात्रा केली.या काळातच ते 'गुरुनानक' बनले.

       लहानपणी मौजीबंधनाच्या विधीच्या वेळी त्यांनी जानवे घालण्याचे नाकारले.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "या जानव्याला काही अर्थ नाही.यात कसलेही सामर्थ्य नाही,की पावित्र्यही नाही.हे जानवे कुजते,तुटते.हे जानवे तयार करणाऱ्यांचे लक्ष फक्त पैशांकडे असते.असा माणूसच जर लोभी आहे,तर त्याने तयार केलेलं जानवे मी का घालावे? " त्यांचा हा प्रश्न ऐकून प्रत्येकजण विचारात पडला.त्यावर गुरुंनी विचारले," नानक ,मग तुला कसे जानवे घालायला आवडेल?" त्यावर नानकांनी उत्तर दिले," खरा दयाभाव हा कापूस.त्यातून समाधानाचा धागा काढावा.त्याला सत्यनिष्ठेचा पीळ द्यावा.संयमाच्या गाठी द्याव्यात.हे जानवेच खरे पवित्र जानवे.असे जाणावे घातले,म्हणजे ते कधीही तुटतही नाही ,कुजातही नाही की जळतही नाही.असे  जानवे जो घालील ,तो धन्य होईल.

                      नानकांच्या काळातही सतत मुसलमानी आक्रमणे होत होती,हिंदूंचा छळ होत होता; आणि धर्म बदलाची सक्ती होत होती.या सगळ्याला विरोध करून हे सर्व थोपवण्यासाठी संघर्ष होत होता.हिंदू धर्माच्या चौकटीत हे कार्य होणार नाही,यासाठी स्वतंत्र पंथ तयार केला पाहिजे ,असे नानकांना वाटले.त्यातूनच शिख धर्माची स्थापना झाली.

समाजाला एकत्र आणण्यासाठी नानकांनी सर्वांची एकाच उपासनेची पद्धत सुरु केली.संगत, तसेच आपापसातील श्रेष्ठ-कनिष्ठ ही भावना नाहीशी करण्यासाठी त्यांनी सहभोजन ,अर्थात लंगरची प्रथा सुरु केली.नानकांचा पंथ भक्तीमार्गी होता;तरीही त्यांना सन्यास(संसार मोडणे) मान्य नव्हते.संसार करता-करताच मोक्ष मिळवण्याचा त्यांनी उपदेश केला.

इ.स.1538 साली आषाढ शुद्ध दशमीला नानकांनी देह ठेवला.गुरुनानकांनी दिलेला उपदेश आचरणात आणण्यासाठी व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'गुरुनानक जयंती' साजरी केली जाते.