महात्मा जोतिबा फुले
मित्रांनो, आज आपली आई सुशिक्षित आहे, आपली बहीण शाळेत -जाते नि आपल्याला शिकवणाऱ्या बाईच आहेत, याचे सारे श्रेय आहे महात्मा जोतिबा फुले यांना. स्त्रिया आणि दलित बांधव यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत सर्वप्रथम प्रज्वलित करणाऱ्या ह्या महापुरुषाचा जन्म १८२७ मध्ये झाला.
जोतिबांचे शिक्षण मिशन स्कूलमध्ये झाले, त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र वाचले, जॉर्ज वॉशिंग्टनचे चरित्र वाचले. पुढे इंग्रजी चांगले वाचायला यायला लागल्यावर थॉमस पेनच्या 'राईट्स् ऑफ मॅन' या पुस्तकाचा त्यांनी अभ्यास केला. त्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यातूनच लोकजागृती व लोकशिक्षणाचे काम त्यांनी हाती घेतले.
त्या काळातील परिस्थिती समजून घेऊन त्यांनी स्त्री- उद्धाराचा ध्यास घेतला. एक स्त्री शिकली, तर घर सुधारते; घर सुधारले, की समाज सुधारतो; समाज सुधारला, की देश सुधारतो; म्हणून प्रथम त्यांनी १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यांनी स्त्री-उद्धाराचा ध्यास घेतला. मुलींना शिकवण्यासाठी प्रथम त्यांनी स्वतःची पत्नी सावित्रीबाईंना साक्षर केले. लोकांचा विरोध आणि छळ सोसून सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात साथ दिली. स्त्रीला या ज्ञानप्रकाशात आणणारे जोतिबा म्हणजे शैक्षणिक क्रांतीचे आद्यजनक होत. जोतिबांचे कार्य, वाढती लोकप्रियता समाजातील काही लोकांना
खटकू लागली. एकदा तर लोकांनी त्यांच्यावर मारेकरी घातले. मध्यरात्रीच्या शांत वेळी जोतिबा झोपले असताना दोन आकृती त्यांना दिसल्या. त्यांनी विचारले, “कोण आहे ? कशासाठी आलात ?" या प्रश्नांची उत्तरे मिळाली. जोतिबांना आश्चर्यच वाटले. त्यांनी त्या मारेकऱ्यांना विचारले, “मला मारून तुमचा काय फायदा ?" त्यावर ते मारेकरी उत्तरले, "आम्हाला या कामासाठी प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत.” त्यावर जोतिबा म्हणाले, “ठीक आहे. माझ्या मृत्यूमुळे तुमचा फायदा होणार असेल, तर मला खुशाल मारा. माझे आयुष्य दीन- दलितांसाठीच आहे. तेव्हा माझ्या मृत्युमुळे तुमचे हितच होणार आहे.' जनतेच्या उद्धारकर्त्याचे शब्द ऐकताच मारेकरी खजील झाले. दोघेही त्यांच्या पाया पडले नि पुढे त्यांचे ते निष्ठावंत भक्त बनले..
जोतिबांनी 'सत्यशोधक समाज' नावाची संस्था स्थापन केली. त्यातून त्यांनी विवाहाच्या पद्धतीत बदल सुचवला. स्त्री-जीवनाची कथा व व्यथा जाणून त्यांच्या उद्धारासाठी अविश्रांत धडपड करून नवा समाज घडविणाऱ्या या लोकनायकाला लोकांनी 'महात्मा' ही पदवी अर्पण केली.
असे हे थोर पुरुष २८ नोव्हेंबर १८९० रोजी काळाच्या पडद्याआड गेले. प्रत्येक स्त्रीला सुशिक्षित करणाऱ्या या पित्याला समाज कधीच विसरणार नाही.