November 24, 2022

स्वामी विवेकानंद Swami Vivekanand


स्वामी विवेकानंद

मित्रांनो, स्वामी विवेकानंदांना ओळखत नाही, असा या जगात कोणीही नसेल. अशा महान व्यक्तीचे बालपण कसे असेल, अशी उत्सुकता मला नेहमीच वाटते. म्हणूनच मी विवेकानंदांच्या बालपणाविषयी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे.

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. या नरेंद्राचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथील सिमुलिया विभागात श्री. विश्वनाथ दत्त व भुवनेश्वरीदेवी या माता-पित्याच्या पोटी झाला. हा नरेंद्र लहानपणी फारच अवखळ होता. धाक-दपटशा, भीती, यांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नसे. त्याला भूत-पिशाच्च, ब्रह्मराक्षस अशा कुणाचीही भीती वाटत नसे. कुणीतरी सांगितलेल्या गोष्टींवर त्याचा अजिबात विश्वास बसत नसे, प्रत्यक्ष पुराव्याशिवाय, अनुभवाशिवाय कोणतीही गोष्ट तो स्वीकारत नसे.

नरेंद्राला ध्यान लावून, बसण्याची विलक्षण आवड होती. एकदा

नरेंद्र मित्रांबरोबर खेळत होता. खेळता-खेळता घराच्या तिसऱ्या

मजल्यावरील शिवाच्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसण्याचा खेळ सुरू झाला.

थोड्या वेळाने एका मित्राला तिथे नाग दिसला. नागाचा मोठा फणा पाहून

तो घाबेरला, ओरडू लागला. सारी मुले थरथर कापू लागली. त्यांनी

दरवाजा उघडला नि तिथून पळ काढला. परंतु नरेंद्र मात्र तिथेच ध्यानस्थ बसलेला. त्याचे ध्यान संपल्यावर त्याला ही सर्व हकीगत समजली, तेव्हा तो म्हणाला, "मला तर काहीच समजले नाही." नागाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण नाग कुठेच दिसला नाही. असा हा निर्भय व एकाग्रचित्त असलेला नरेंद्र अर्थातच अभ्यासात हुशार होताच.

शाळेत गुरुजी जे शिकवत, ते तो डोळे मिटून एकाग्रचित्ताने ऐकत असे. ऐकताक्षणीच त्याचे सारे पाठ होत असे. केवळ पाठ्यपुस्तके, परीक्षा, यावर त्याचे समाधान होत नसे. त्याचे अवांतर वाचनही अफाट होते. भारतीय इतिहासावरील बहुतेक सर्व ग्रंथ व इतर प्रसिद्ध लेखकांचे विविध विषयांवरील ग्रंथ त्याने वाचून काढले होते.

नरेंद्राचे अभ्यासाशिवाय अन्य कलांवरही तितकेच प्रभुत्व होते. त्याने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. संगीताबरोबरच तबला, पखवाज, मृदुंग, सतार, दिलरुबा इ. वाद्येही तो कौशल्याने वाजवू शकत होता. नृत्याचेही त्याला ज्ञान होते.

नरेंद्राचे शरीरसौष्ठवही वाखाणण्यासारखे होते. व्यायाम, घोडदौड, पोहणे यांतही तो निपुण होता. चिंतनशीलता, ध्यानपरायणता, अध्ययनशीलता, चित्ताची पवित्रता, हे गुण त्यांच्या अंगी असल्यानेच नरेंद्राचे ते स्वामी विवेकानंद होऊ शकले.