12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती
12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती. 'तेजस्विता' आणि 'तपस्विता' हे दोन शब्द आपल्यासमोर जेव्हा उभे राहतात , तेव्हा तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून 'स्वामी विवेकानंद' यांचे नाव आपल्यासमोर उभे राहते. अशा या महान विभूतीचा जन्म 12 जानेवारी 1863 साली कोलकत्ता येथील सिमेलिया या ठिकाणी झाला. विश्वनाथ दत्त व भुवनेश्वरी देवी यांचे पुत्र म्हणजे विवेकानंद.
स्वामीजींच्या शालेय जीवनापासून पाहिले तर असंख्य दाखले आणि उदाहरणे स्वामीजींच्या बाबतीत पहावयास मिळतात.देव आणि धर्म,कर्मकांड यामध्ये विभागलेल्या समाजाच्या परिस्थितीकडे स्वामीजींनी स्वतःचे लक्ष वेधले . स्वामीजी त्यांच्या याच कृतीतून उदयास आले व संपूर्ण देश भ्रमंती करण्याचा निर्णय स्वामी विवेकानंदांनी घेतला.
स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत , कोणत्याही राष्ट्राचे भवितव्य हे त्या राष्ट्रातील युवा पिढीवरती अवलंबून असते. राष्ट्राची जडणघडण ही त्या देशातील युवाशक्तीच्या प्रेरणेवरती अवलंबून असते. अशीच शक्ती मला राष्ट्रासाठी संघटित करायची आहे. हे स्वामीजींच्या मुखामध्ये सदैव उद्गार असत. अंगावरती भगवी वस्त्रे , डोक्यावरती फेटा घालून स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञान लोकांच्या समोर मांडण्यासाठी जगभ्रमंती केली.
शिकागोतील धर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबरला स्वामीजी ज्यावेळी शिकागो येथे धर्म परिषदेसाठी गेले होते. त्यावेळी स्वामीजींचा वेश पाहून सर्व लोक अचंबित झाले होते.हा संन्याशी माणूस काय बोलणार, असा सर्व लोकांना प्रश्न पडला होता.स्वामीजी ज्यावेळी बोलायला उभे राहिले, सभागृहावरती चौफेर नजर फिरवल्यानंतर स्वामीजींनी आपल्या भाषणाची सुरुवात ' माझ्या बंधू आणि भगिनींनो' या एकाच वाक्याने केली आणि सभागृहांमध्ये प्रचंड टाळ्या. एका भाषणाने सर्व लोकांना मंत्रमुग्ध केले आणि विवेकानंदांनी आपल्या हजारो शिष्यांची निर्मिती केली.पाश्चिमात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकत असलेल्या भारतीय संस्कृतीला ,भारतीय जनतेला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य स्वामीजींनी केले.
सर्वधर्मसमभाव, संयम आणि शांततेचा मार्ग पत्करणारा महापुरुष महान,त्यागी देशभक्त ,महान तत्वज्ञ, बुद्धिजीवी व्यक्तिमत्व, प्रतिभा संपन्न असा वक्ता म्हणून स्वामीजींच्याकडे पाहिले जाते. जगभराची भ्रमंती करणाऱ्या या महामानवाने वेगवेगळ्या देशांमध्ये फ्रान्स, जर्मन ,अमेरिका व इंग्लंड या ठिकाणी गाजलेली त्यांची पाच भाषणे आजही प्रसिद्ध आहेत.
'मातापित्यांबरोबरच मातृभूमीला ही महत्त्व देणारा एक महान योगी आणि एक ब्रह्मचारी' अशी ख्याती स्वामी विवेकानंद यांच्या बाबतीत पहावयास मिळते. अशा या महान विभूतीचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी झाला. आज ही कन्याकुमारी या ठिकाणी गेल्यानंतर स्वामीजींच्या कर्तृत्वाची ओळख होते.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा 'युवक दिन' म्हणूनही साजरा केला जातो. तारुण्याचा उपयोग हा जनसामान्यांसाठी करायचा असतो. देश प्रेमाने व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रसार करणाऱ्या विभूतींमध्ये स्वामीजींचा समावेश होतो. आजच्या युवा पिढीने याच गोष्टींचा आदर्श घेण्याचे कार्य जर केले तर स्वामीजींच्या स्वप्नातील हा देश साकार होईल असे वाटते.
कर्मकांडांना विरोध करून मानवतावादी विचार मांडणारा, समतेचा संदेश देणारा ,राष्ट्रप्रेमाची पताका खांद्यावरती घेऊन धर्मप्रसार करणारा एक महान विभूती म्हणून स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिले जाते. याच तपस्वी, त्यागी वृत्तीचा, प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या युवकांचा आदर्श आजच्या युवा पिढीने त्यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी करत असताना घेणे गरजेचे आहे.
धन्यवाद !