नेताजी सुभाषचंद्र बोस
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांचीच आपल्याला मोठ्या प्रमाणात आठवण होत असताना पहावयास मिळते. देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा' पद्धतीला अगदी तशाच पद्धतीने उत्तर दिले पाहिजे, असे रोखठोकपणे प्रखर विचार मांडणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा राज्यातील कटक या गावी 23 जानेवारी 1897 साली झाला. आपले महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर ते विदेशात उच्च शिक्षणासाठी गेले. आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील परकीयांच्या सेवेत गुंतण्यापेक्षा स्वकीयांची सेवा कधीही चांगली, ही भूमिका समोर ठेवून नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधीजींच्या समवेत स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले. 1923 मध्ये महात्मा गांधीजी व नेताजी यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले. यातूनच नेताजींनी 'स्वराज्य पक्षात' प्रवेश केला.
नेताजी आपल्या कृतीशील विचारांमुळे बंगाल नगरपालिकेचे कार्याधिकारी बनले. 1924 साली नेताजींचे क्रांतिकारी विचार पाहून , त्यांना मिळणारा तरुणांचा प्रतिसाद पाहून ब्रिटिशांनी नेताजींना तुरुंगात धाडले. नेताजी 1938व 1939 या दोन्ही वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. पुन्हा 1939 साली आपल्याच विचारश्रेणीत 'फॉरवर्ड ब्लॉक' पक्षाची स्थापना केली.
भारतात राहून ब्रिटिशांचा पराभव करता येणार नाही तर जागतिक अंदाज घेऊन ब्रिटिशांचा पाडाव करता येईल, अशी नेताजींची ठाम भूमिका होती. नेताजी 1941 साली रशिया मार्गे जर्मनीला पोहोचले. परदेशात गेल्यानंतर नेताजींनी 'आझाद हिंद सेना' ही संघटना रासबिहारी बोस व कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने 1942 साली स्थापन केली. तसेच 1943 साली आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद स्वीकारले. आपल्या सेनेत नुसते पुरुष असून चालणार नाहीत तर स्त्रियांचाही सहभाग असला पाहिजे यासाठी नेताजींनी आझाद हिंद सेनेत 'झाशीची राणी' रेजिमेंट ची सुरुवात केली आणि त्याचे नेतृत्व हे कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्याकडे दिले. पारतंत्र्याच्या कालखंडातही स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारा क्रांतिकारक महापुरुष म्हणून नेतांजींकडे पाहिले जाते. सैन्याचे, प्रजेचे नेतृत्व करण्याची क्षमता पाहून जनतेने त्यांना 'नेताजी' ही पदवी बहाल केली.
"तुम मुझे खून दो ! मै तुम्हे आझादी दूंगा!" या एका वाक्यात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कलकत्त्यापासून सिंध पर्यंत लाखो तरुणांना संघटित करण्याचे कार्य नेताजींनी केले.देशाला स्वातंत्र्य हे शांततेतून नाही तर क्रांतीच्या बळावरच मिळणार आहे, हे नेताजींना माहीत होते. नेताजींनी 'जय हिंद!' आणि 'चलो दिल्लीचा' नारा दिला. 1943 ला अंदमान निकोबार बेटे जिंकून त्यांचे नामकरण 'शहीद', 'स्वराज्य' असे केले 1944 साली आझाद हिंद सेनेने मॉवडॉक हे ठाणे जिंकून भारतीय भूमीतील पहिला विजय साजरा केला व थेट कोहिमा व इंफाळ पर्यंत धडक मारली. 1945 मध्ये 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा व 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या जपान मधील शहरांवरती अणुबॉम्ब टाकल्याने युद्धाची गती थंडावली गेली. आझाद हिंद सेनेचे कार्य हे अल्प प्रमाणात भारतात थोड्या पद्धतीत थंडावले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी शिवनीतीचा वापर करत वेशांतर करून देशांतर करणारे एक क्रांतिकारी महापुरुष म्हणून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याकडे पाहिले जाते. जपान, जर्मनी यांसारख्या देशांची मदत मिळवण्यासाठी ते यशस्वी झाले होते. त्याचबरोबर आपल्या समवेत क्रांतिकारी विचारांचे तरुण निर्माण करत होते. अशा या महान नेत्यावरती ब्रिटिशांनी वेगवेगळ्या पद्धतीचे खटले दाखल केले ,तुरुंगात डांबले पण नेताजींनी तुरुंगात असतानाही आमरण उपोषण केले. ब्रिटिशांना त्यांना तुरुंगातून सोडून द्यावे लागले .ज्यावेळी नेताजी घरी होते त्यावेळी त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. अशा या महान महापुरुषाचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी टोकियोकडे जात असताना ताई पै येथे विमान अपघातात झाला.
एक उत्तम प्रशासकीय अधिकारी ते स्वातंत्र्य सेनानी म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अग्रक्रमाने नाव घेतले जाते.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारी विचारांची चळवळ अंमलात आणून शस्त्राच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा एक महान सेनानी म्हणून, नेताजींचे नाव घेतले जाते. परकीय सत्तेचा योग्य पद्धतीने संबंध ठेवून, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची मदत घेऊन स्वातंत्र्याचे गीत गाणारे व परकीय सत्तेला नेस्तनाबूत करणारा महान योद्धा म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गौरव होतो.
नेताजींच्या मृत्यूनंतर सुद्धा आझाद हिंद सेनेचे कार्य नेताजींच्या विचारांनी प्रभावी झालेल्या लाखो तरुणांनी प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या असंख्य समर्थकांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे खटले दाखल केले गेले. पण या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या समर्थकांच्या बचावा करता पंडित नेहरू, देसाई यांसारख्या नामवंत वकिलांनी वकिली केली. त्यांच्यावरती असणारे खटले रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. आज याच महापुरुषांच्या विचारांचा आपण आदर्श घेऊया.
जय हिंद ! जय भारत !
नेताजींविषयी उत्कृष्ट भाषण येथे पहा .