आपला राष्ट्रीय सण - प्रजासत्ताक दिन
दिवस हा सोन्याचा ,
तुमच्या माझ्या आनंदाचा ,
देशाच्या गौरवाचा .....
अभिमानाचा आणि उत्साहाचा !
दिवस हा आपुल्या न्यायाचा ... ,
विजय असो
प्रजासत्ताक दिनाचा !
सन्माननीय व्यासपीठ , व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर , वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो ,
आज २६ जानेवारी - म्हणजेच आपला ' प्रजासत्ताक दिन '. आपल्या सर्वांच्या या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणांस काही चार शब्द सांगणार आहे , ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्रतापूर्वक विनंती करत आहे.
आपण सर्वजण सन १९५० पासून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' किंवा ' गणराज्य दिवस' म्हणून साजरा करतो .भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे.म्हणजेच लोकांनी, लोकांच्यासाठी , लोकांकरवी चालवलेले राज्य आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण इंग्रजाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झालो.स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय देणारी राजकीय व्यवस्था सुरु झाली . यालाच आपण 'लोकशाही शासनव्यवस्था' असेही म्हणतो.
या सर्वांचा पाया होता ' भारतीय राज्यघटना'.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार , नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे , हे देशासमोर मोठे आव्हान होते.शेवटी ही जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती लिलया पेलली.त्यामुळे सर्व जगात श्रेष्ठ आणि आदर्श म्हणून ओळखली जाणारी 'भारतीय राज्यघटना' आकारास आली.त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांना ' भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' असे म्हणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर , डॉ.राजेन्द्रप्रसाद , यासारख्या अनेक महनीय व्यक्तींचे घटनानिर्मितीत मोलाचे कार्य आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करणेत आला आणि २६ जानेवारी १९५० पासून हे संविधान संपूर्णपणे लागू करण्यात आले.साऱ्या देशाने अन्यायाची,गुलामगिरीची कात टाकली आणि भारतभूमीत स्वातंत्र्य , समता , न्याय व बंधुता या लोकशाहीच्या सोनेरी पानांचा उदय झाला.म्हणूनच स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच हा दिवसही आपणा सर्वांसाठी आनंदाचा , आदराचा ,उत्साहाचा व त्यागाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
याच दिवशी आपल्या पवित्र भारतभूमीवर एका नव्या युगाचा प्रारंभ झाला.प्रत्येक मानवास सन्मानाने जगण्याचे, उंच भरारी घेण्याचे बळ या घटनेने दिले.म्हणूनच आपण हा दिवस आनंदाने व उत्साहाने साजरा करत आहोत व करत राहणार !
या मंगलदिनी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो .त्याचबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या व सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व थोर व्यक्तींना याप्रसंगी वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो !
जय हिंद ! जय भारत !