January 15, 2023

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण माझा भारत महान






प्रजासत्ताक दिनानिमित्त

मराठी भाषण

     माझा भारत महान

 आम्ही सारे भारतीय आहोत.

 भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.

 प्रार्थनेच्या वेळी प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याकडून ही प्रतिज्ञा म्हणून घेतली जाते या प्रतिज्ञातून व्यक्त होणाऱ्या भावना लहानपणापासूनच मुलांच्या मनात दृढ होत जातात.

   आपल्या भारत मातेच्या अफाट पसरलेल्या भूमीवर विविध भाषा, विविध संस्कृती,अनेक जाती अनेक धर्मांची लोक आहेत. या देशात उत्तरेला जम्मू काश्मीर पासून दक्षिणेला तामिळनाडू केरळ पर्यंत, पश्चिमेला असलेल्या गुजरात महाराष्ट्रापासून ते पूर्वेच्या आसाम नागालँड पर्यंत 29 राज्य आहेत प्रत्येक राज्याची स्वतःची अशी मातृभाषा,  बोलीभाषा यामध्येही विविधता आहे.

 हिंद देश के निवासी,

 सभी जन एक है 

 रंग रूप वेश भाषा

 चाहे अनेक है ।'

 या भारत देशामध्ये हिंदू हा प्रमुख धर्म मानला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदू संस्कृती प्रत्येक भारतीयांच्या नसानसात भिनलेली आहे. असे असले तरी याच भूमीवर मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, बौद्ध अशा अनेक धर्मांनाही तेवढाच मानसन्मान दिला जातो. प्रत्येक धर्मातील सण सारख्याच प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हिंदू धर्मातील दिवाळी,होळी,गणेशोत्सव यांसारख्या सण-उत्सवांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन बांधव सामील होताना दिसतात. तर मुसलमान बंधूंच्या ईद मध्ये हिंदू लोक ही आनंदाने भाग घेतात. ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणासाठी तर  सर्वच भारतीय एकमेकांना 'मेरी ख्रिसमस' असे म्हणत केक, मिठाई शुभेच्छा ख्रिसमस ट्री ची सजावट यांचा वर्षाव करतात. म्हणून कवी वसंत बापट प्रार्थना करतात....

 भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना

 मानवाच्या एकतेची, पूर्ण होवो कल्पना 

 मुक्त आम्ही फक्त मानू, बंधूतेच्या बंधना

 सत्य सुंदर मंगलाची,नित्य हो आराधना

 अशा या उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन्मधुर भावना असलेल्या देशांमध्ये मात्र काही वेळा जातीय दंगली, धार्मिक तेढ, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, परकीय आक्रमणे अशा काही भयानक संकटांचा सामना करावा लागत आहे. कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमा भागात  चालू असलेला संघर्ष, पूर्वेला धुमसत असलेला नक्षलवाद, स्वतंत्र विदर्भासाठी चालू असलेले आंदोलन, दोन राज्यांमध्ये असलेला पाणी प्रश्न अशा देशांतर्गत चालू असलेल्या समस्यांबरोबरच शेजारील देशांची आक्रमणे, घुसखोरी,दहशतवाद यांसारख्या भयानक संकटांशी दोन हात करावे लागत आहेत.

   भाषाभेद,दारिद्र्य,बेकारी आर्थिक विषमता,भ्रष्टाचार, लाचखोरी, वशिलेबाजी यांच्या खाईत लोटलेल्या भारतीयांची आपल्या स्वतःची भारतीयत्वाची जाणीव हळूहळू बोथट होऊ लागली आहे. एकमेकांशी प्रेमळ संवाद करणारे डोळे दुसऱ्याकडे संशयाने बघू लागले आहेत. असे असताना माझा देश,माझे देश बांधव, मी भारतीय अशी एकजुटीची भावना कशी बळकट होणार?

पण सभोवतालच्या दुःखांना संकटांना घाबरतील तर ते भारतीय कसले ?

' भीती न आम्हा तुझी मुळी ही

 गडगडणाऱ्या नभा,

 अस्मानीच्या सुलतानीला

 जबाब देती जिभा'

 असे निर्भीडपणे सांगणाऱ्या भारतीयांच्या नसानसातून देशाभिमान, एकात्मता या भावना उसळून वाहत आहेत.

   इतिहासाची पाने चाळली तर लक्षात येईल की, लाखो लोकांनी आजपर्यंत देशासाठी बलिदान दिले आहे. अजूनही लोक देशाच्या अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी बलिदान देत आहेत. त्यासाठी आपण भारतीयांना  अभिमान असला पाहिजे. आपणही आपापल्या परीने देशासाठी काही ना काहीतरी  योगदान दिले पाहिजे.

   आपण सारे भारतीय एकत्र आलो तर काय चमत्कार घडेल! आपल्या भारतामध्ये अशा कितीतरी चांगल्या बाजू आहेत. आपला देश जगामध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश आहे. हीच आपली मोठी शक्ती आहे.

 आपण जर या मनुष्यबळाचा कुशलतेने वापर करून घेतला तर जगामध्ये आपला देश सर्वात शक्तिशाली होईल.

      दुष्ट शत्रूंविरुद्ध लढण्याची हिंमत आम्हाला श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून दिलेली आहेच. त्याचबरोबर अलीकडच्या काळातील स्वातंत्र्यसैनिक, थोर समाजसुधारक उदाहरणार्थ- लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यापासून ते आधुनिक काळातील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर,अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजासाठी वाहून घेतलेल्या थोर व्यक्तीमत्त्वामुळे सर्वांनाच देश प्रेमाची प्रेरणा मिळते. मग लढा स्वातंत्र्याचा असो वा परकीय आक्रमणांचा. ते आंदोलन भ्रष्टाचार निर्मूलनाचे असो वा अंधश्रद्धा निर्मूलनाचे.आपण सारे भारतीय एकजूट होऊनच लढू.कारण

 'भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई!

 पावन भूमी भारतातली ही आमची आई!!

 धन्यवाद!



January 9, 2023

माझा भारत महान Majha Bharat Mahan Marathi bhashan




 माझा भारत महान

 मराठी भाषण


माझा हिंदुस्थान,माझा,माझा हिंदुस्थान 

हिमाचलाचे हीरक मंडित शिरभूषण भरदार 

वक्षावर गंगा यमुनांचे सळसळती मौक्तिक हार 

कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार 

महोदधीचे चरणा जवळी गर्जतसे आव्हान  

       माझ्या भारतभूचे हे वर्णन ऐकताना रोमरोम फुलून येतो आणि निसर्गाच्या या मुक्त लावण्याबरोबरच गिरीशिखरांचे आणि महासागरांचे आव्हान नजरेसमोर ठाकते. भारताच्या नावाबरोबरच मला आठवते ती माझ्या देशाची अनेकविध परंपरा,संस्कृती आणि पवित्र्य यांचा मनोहर संगम इथं विनयाच्या कोंदणात शौर्य खुलतं तसा लाजऱ्या स्मितातून शालिनीता खुलते. शृंगाराबरोबर वीरता आणि विविधतेतून एकता हे माझ्या देशाचे रमणीय रूप आहे.

      माझ्या देशाची संस्कृती संपूर्ण विश्वात वंदनीय, पूजनीय आहे.म्हणूनच स्वामी विवेकानंदांची माय 'ब्रदर्स अँड सिस्टर्स ' ही हाक साऱ्या धर्म मार्तंडाचे काळीज काबीज करून गेली.

       माझ्या देशावर निसर्गाने आपले लावण्य मुक्तहस्ते उधळले आहे. जणुसृष्टीचा लावण्य महोत्सवच. उत्तुंग हिमगिरी, नजर फिरेल अशा खोल दऱ्या,खळखळ करणाऱ्यांना नद्या,डोलणारी हिरवी शेती, तऱ्हेतऱ्हेची मनोहर फुले आणि पावला पावलावर बदलणारी अनेक मनोहर दृश्ये. निसर्गाचे हे मुक्त लावण्य जगाच्या पाठीवर कुठेही नाही. इंद्रधनुचे सात रंग, मोरपिसांची मोहक रंगसंगती यांचा सुरेख लावण्यविलास फक्त माझ्या देशातच पाहायला मिळतो.

'श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटेचोहिकडे,

क्षणात येते सरसर शिरवे,

क्षणात फिरुनी ऊन पडे.'

 हे फक्त माझ्या देशातच शक्य आहे.निसर्गाच्या या मुक्त लावण्यात आणखी एक रंग मिसळला आहे लाल. तो रंग आहे रक्ताचा.स्वधर्म, स्वदेश यांच्यासाठी ज्यांनी या धरणीवर आपले रक्त सांडले,तो रक्ताचा लाल रंग माझ्या देशातील त्यागाची महती सांगतो. सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,कृष्णदेवराय,राणा प्रताप या महापराक्रमी राजांनी माझ्या देशाचा इतिहास आपल्या रक्तांनी रंगवला आहे आणि माझ्या देशाची संस्कृती 'त्यागाची आहे भोगाची नाही' हे सिद्ध केले आहे.

      संस्कृती, संस्कृती असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला एक अर्थ आहे.हा अर्थ 'प्रकृती,विकृती आणि संस्कृती' या तीन शब्दाधारे व्यक्त करता येतो. भूक लागली असता खान ही प्रकृती. भूक लागली नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला याची अधिक गरज आहे हे पाहून त्याला खायला घालणं ही संस्कृती आणि हीच आमची संस्कृती आहे. म्हणून तर 'अतिथी देवो भव' हा महामंत्र आम्ही जपला आहे.

    यजमानाचा धर्म आणि अतिथीचे स्वागत हे आमच्या संस्कृतीचे दोन स्तंभ आहेत. आमच्या संस्कृतीची शालिनीता, पावित्र्यता जपण्यासाठी आमच्या स्त्रियांनी सुद्धा आपले सर्वस्व पणाला लावले आहे म्हणून तर.......

 'अहिल्या, द्रौपदी,सीता,तारा मंदोदरी तथा

पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम् 

 असे आम्ही म्हणतो.आपल्या शालिनीतेने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आमच्या स्त्रियांनी आपल्या शौर्यानेही जगाचे डोळे दीपवले आहेत. राणी लक्ष्मीबाई,राणी चन्नम्मा,जिजाऊ माँसाहेब,अहिल्या होळकर, ताराराणी या स्त्रियांनी आपल्या डोईवरचा पदार्थ तसुभरही न हलवता हातात तलवारी घेतल्या आणि शालिनीता,पावित्र्य याचबरोबर रणचंडीकाही जगाला पाहायला मिळाल्या. हे फक्त माझ्या देशातच घडू शकते.

    माझ्या देशाची ही संस्कृती, ही परंपरा साऱ्या जगात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे हे मी अभिमानाने सांगतो.रामाचा त्याग, लक्ष्मण- भरताचे बंधुप्रेम,हनुमानाची स्वामिनीष्ठा, सीतेची पतीनिष्ठा, अर्जुनाचे शौर्य, भीमाची ताकद आणि कृष्णाचे कर्मयोग हे फक्त माझ्या देशातच निर्माण झाले. राम- कृष्णाची परंपरा,शिवाजी महाराज, राणा प्रताप यांचा चा इतिहास ही माझ्या देशाची श्रद्धास्थाने आहेत. शंकराचार्य, रामशास्त्री,भवभूती,कालिदास, व्यास,वाल्मिकी राजाभोज,शाहू महाराज,भगतसिंग,महात्मा गांधी, नेहरू, सावरकर, टिळक यांच्यापासून ते ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, कुसुमाग्रज यांच्यापर्यंतची अगणित अनमोल रत्ने केवळ माझ्या देशाच्या मातीतच जन्मली. हा माझ्या देशाचा तर गौरव आहेच पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तींचा गौरव जास्त आहे ज्यांना भारतभूसारखी मातृभूमी लाभली.

       अंतराळात आज आमची विमाने भिरभिरत आहेत. आमच्या पाणबुड्या सागरतळाचा शोध घेत आहेत.आमचे डॉक्टर नवनवीन औषधे शोधण्यात मग्न आहेत.आमचे शास्त्रज्ञ मानवाचे जीवन अधिकाधिक सुखी करण्यात प्रयत्नशील आहेत. आमचे खेळाडू देशाचा ध्वज आंतरराष्ट्रीय सामन्यातून अभिमानाने उंचावत आहेत. आमची मुस्लिम शीख  भावंडे आमच्या हातात हात घालून चालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या सत्ताधारी पक्षाने व विरोधी पक्षांनी आमच्या देशातील लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत ठेवली आहे.

    म्हणूनच नेहरूंसारखा पुरुषोत्तम या देशाच्या मातीतच आपली रक्षा विसर्जित व्हावी अशी इच्छा बोलून दाखवतो तर भगतसिंग सारखा तेजस्वी युवक हसत हसत फासावर जाताना 'पुनर्जन्म जर असेल तर तो मला भारत भूमीतच मिळावा' अशी आस मनी बाळगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर '  ने मजसी ने परत मातृभूमीला ' अशी त्या सागराला विनवणी करतात तर इकबाल सारखा एखादा कवी 'हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा 'अशी जाहीर कबुली देऊन माझ्या देशाला मानवंदना देतो. माझ्या देशाचा तिरंगा आपल्या तीन रंगाने विविधतेतून एकतेबरोबरच आमची त्यागाची,शांततेची आणि समृद्धीची प्रतिमा आसमानापर्यंत उन्नत मानेने सांगतो आहे.

    माझ्या देशाच्या या साऱ्या सत्यशील,सुंदरतेला दृष्ट लागू नये म्हणून हत्याकांडाचे भ्रष्टाचाराचे, गालबोट लागले आहे.हे गालबोट जोपर्यंत चेहऱ्यावरील तिळाच्या रूपात असते तोपर्यंत ते सौंदर्यतीत ठरते पण हे गालबोट जर साऱ्या सौंदर्यावर पसरले तर या सुंदरतेची कुरूपता व्हायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवायचं तुम्ही,आम्ही साऱ्यांनी ज्यांना तिरंगा पाहताना भरून येत त्यांनी.

  म्हणूनच मित्रांनो चला, तुम्हाला खळाळणाऱ्या सागराची आण... तुम्हाला या भूमीच्या कणाकणाची शपथ..... या माझ्या देशाची ही गौरवशाली परंपरा,त्या परंपरेचे आपण पाईक आहोत.म्हणूनच आपण एक मुखाने म्हटले पाहिजे...

 गे माय भू तुझे मी,

 फेडीन पांग सारे.

आणीन आरतीला,

हे सूर्य,चंद्र तारे.

 धन्यवाद!




 





January 7, 2023

भाषाविषयक सामान्य ज्ञान Samanydnyan




 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत, भाषाविषयक सामान्य ज्ञान.

-----------------------------------

 कवी व लेखकांची पूर्ण नावे.

-----------------------------------

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे - पु ल देशपांडे

पांडुरंग सदाशिव साने-  साने गुरुजी

कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

यशवंत दिनकर पेंढारकर - कवी यशवंत

त्र्यंबक बापूजी ठोंबरे -  बालकवी

विष्णू वामन शिरवाडकर-  कुसुमाग्रज

राम गणेश गडकरी -  गोविंदाग्रज

मुरलीधर नारायण गुप्ते -  बी

-----------------------------------

थोर व्यक्तींची नावे व संबोधने

-----------------------------------

लोकमान्य -  बाळ गंगाधर टिळक

राष्ट्रपिता - मोहनदास करमचंद गांधी

सरदार, लोहपुरुष -  वल्लभभाई पटेल

नेताजी - सुभाषचंद्र बोस

महात्मा - जोतिबा फुले, मोहनदास करमचंद गांधी

पितामह - दादाभाई नौरोजी

स्वातंत्र्यवीर - विनायक दामोदर सावरकर

महर्षी - वी.रा.शिंदे, धोंडो केशव कर्वे

गुरुदेव - रवींद्रनाथ टागोर

पंडित,चाचा - जवाहरलाल नेहरू

------------------------------------

 थोर नेते व प्रसिद्ध व्यक्ती यांची पूर्ण नावे

------------------------------------

म. गांधी -  मोहनदास करमचंद गांधी

पं.नेहरू -  जवाहरलाल मोतीलाल नेहरू

लो. टिळक - बाळ गंगाधर टिळक

म. फुले - जोतिबा फुले

बाबा आमटे - मुरलीधर देविदास आमटे

लता मंगेशकर - लता दीनानाथ मंगेशकर

आगरकर - गोपाळ गणेश आगरकर

आंबेडकर - भीमराव रामजी आंबेडकर

स्वा.सावरकर - विनायक दामोदर सावरकर

------------------------------------

 संतांची पूर्ण नावे

------------------------------------

संत ज्ञानेश्वर - विठ्ठल पंत कुलकर्णी

संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा आंबिले

संत नामदेव - नामदेव दामाशेटी शिंपी

संत एकनाथ - एकनाथ  सूर्यनारायण पंत

संत रामदास स्वामी - नारायण सूर्याजी ठोसर

-----------------------------------

 थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा

-----------------------------------

'आराम हराम है ।'  - पंडित नेहरू

चले जाव -  महात्मा गांधी

"जय जवान, जय किसान " -  लालबहादूर शास्त्री

"मेरी झाशी नही दूंगी ।" -  राणी लक्ष्मीबाई

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा । "-  सुभाषचंद्र बोस

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!" - लोकमान्य टिळक

"जय जवान,जय किसान,जय विज्ञान " - अटल बिहारी वाजपेयी

-----------------------------------

 राष्ट्रीय महत्त्वाची माहिती

-----------------------------------

राष्ट्रीय फूल - कमळ

राष्ट्रीय प्राणी - वाघ

राष्ट्रीय पक्षी - मोर

राष्ट्रीय ध्वज - तिरंगा

राष्ट्रगीत - जन-गण-मन

राष्ट्रीय गीत - वंदे मातरम

-----------------------------------

 काही कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे

-----------------------------------

माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन 

गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी 

शंकर काशिनाथ गर्गे - नाट्यछटाकार, दिवाकर 

चिंतामण त्र्यंबक  खानोलकर - आरती प्रभू 

नारायण मुरलीधर गुप्ते - बी 

दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त 

मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत 

नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास 

यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत 

विनायक जनार्दन करंदीकर-  विनायक 

काशिनाथ हरी मोडक -  माधवानुज 

दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी 

आत्माराम रावजी देशपांडे - अनिल 

प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार 

शंकर केशव कानेटकर गिरीश 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी 

वि. वा. शिरवाडकर - कुसुमाग्रज 

राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज ,,बाळकराम 

कृष्णाजी केशव दामले -  केशवसुत

-----------------------------------

 काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी लेखक 

-----------------------------------

ज्वाला आणि फुले - बाबा आमटे 

स्वेदगंगा - विंदा करंदीकर 

बिजली - वसंत बापट 

गीत रामायण-  ग. दि. माडगूळकर 

यथार्थदीपिका - वामन पंडित 

केकावली - मोरोपंत 

दासबोध व मनाचे श्लोक - समर्थ रामदास 

भावार्थरामायण - संत एकनाथ 

नल -दमयंती ,स्वयंवराख्यान - रघुनाथ पंडित 

अभंग गाथा - संत तुकाराम 

भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) - संत  ज्ञानेश्वर

-----------------------------------

 काही नाटके व त्यांचे नाटककार

-----------------------------------

 नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर 

टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर 

साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी -  अत्रे 

प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव ,एकच प्याला, भावबंधन - राम गणेश गडकरी 

कीचकवध, भाऊबंदकी ,मानापमान, विद्याहरण - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर 

सौभद्र - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर 

शारदा -  गोविंद बल्लाळ देवल

-----------------------------------

 काही पुस्तके व त्यांचे लेखक

-----------------------------------

 एक झाड, दोन पक्षी -  विश्राम बेडेकर 

मृत्युंजय , छावा -  शिवाजी सावंत 

तराळ-  अंतराळ - शंकरराव खरात 

बलुतं -  दया पवार 

कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण 

कऱ्हेचे पाणी - अत्रे 

स्मृती चित्रे - लक्ष्मीबाई टिळक 

एरंडाचे गुऱ्हाड - चि. वी. जोशी 

ययाती - वि. स. खांडेकर 

पडघवली - गो.नी. दांडेकर 

गीता रहस्य - लोकमान्य टिळक 

वहिनीच्या बांगड्या - जोशी 

चक्र - जयवंत दळवी 

स्वामी,श्रीमान योगी - रणजीत देसाई

गीताई - विनोबा भावे 

काळे पाणी,माझी जन्मठेप ,वि. दा. सावरकर 

रथचक्र ,गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे 

गुजगोष्टी - ना.सी. फडके 

श्यामची आई साने गुरुजी 

शाकुंतल, मेघदूत, रघुवंश, कालिदास, मृच्छकटिक,

शूद्रक ,मुद्राराक्षस -  विशाखा दत्त 

गीता - व्यास मुनी 

महाभारत - व्यास मुनी 

रामायण - वाल्मिकी

-----------------------------------

 महाराष्ट्रातील समाज सुधारक ,

 विचारवंत व प्रसिद्ध व्यक्ती

-----------------------------------

जगन्नाथ शंकरशेठ - आधुनिक मुंबईचे शिल्पकार 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर - मराठी वृत्तपत्र सृष्टीचे  जनक 

दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी

गोपाळ हरी देशमुख -लोकहितवादी 

भाऊ दाजी लाड -धन्वंतरी या नावाने गौरव 

महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक 

गणेश वासुदेव जोशी स्वदेशीचे आद्य प्रवर्तक 

सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 

महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री जातीचे उद्धारक ,पहिले महाराष्ट्रीय भारतरत्न 

महाराज सयाजीराव गायकवाड - हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा 

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - आधुनिक काळातील महान कलीपुरुष

राजर्षी शाहू महाराज - सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष

संत गाडगे महाराज - महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ 

सेनापती बापट - संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या आंदोलनातील अग्रणी 

कर्मवीर भाऊराव पाटील - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक

आचार्य विनोबा भावे - भारतीय भूदान चळवळीचे जनक

डॉक्टर पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाजाचे संस्थापक 

क्रांतिसिंह नाना पाटील - ब्रिटिशांच्या विरोधातील प्रतिसरकारचे संस्थापक 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - 'ग्रामगीता ग्रंथाचे' निर्माते

बाबा आमटे - कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन चे निर्माते 

अण्णा हजारे - भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अध्यक्ष

वासुदेव बळवंत फडके - आद्य क्रांतिकारक 

विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमालाकार, मराठी भाषेचे शिवाजी 

शिवराम महादेव परांजपे - काळकर्ते 

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे -  इतिहासाचार्य 

दादासाहेब फाळके - भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक

श्रीधर व्यंकटेश केतकर - ज्ञानकोशकार 

नारायण श्रीपाद राजहंस - बालगंधर्व 

दत्तो वामन पोतदार - महामहोपाध्याय 

चिंतामणराव देशमुख - स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री

डॉ सलीम अली - जागतिक कीर्तीचे पर्यावरण व पक्षी तज्ञ

साने गुरुजी - मृत्यूचे चिंबन चुंबन घेणारा महाकवी, अमृताचा पुत्र 

डॉक्टर होमी भाभा - भारताच्या अणुविज्ञानाचे जनक 




चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी - 12 4th Standard Talent Search Exam Guess Paper



 





 नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, 

या पेजवरती आपणांस इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा विविध घटकावर आधारित Online Tests  सोडवायला मिळणार आहेत. आपण सरावासाठी त्या नक्की सोडवा व आपल्या मित्रांना Share करा. 

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 12

 4th Standard Talent Search Exam
 Guess Paper






यापूर्वीच्या सर्व टेस्ट्स येथे सोडवा .


January 4, 2023

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 11 4th Standard Talent Search Exam Guess Paper

 




चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 11
 4th Standard Talent Search Exam Guess Paper

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, 



चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 11
 4th Standard Talent Search Exam Guess Paper
येथे सोडवा .





January 3, 2023

माझा भारत महान मराठी भाषण निबंध Majha Bharat Mahan




 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत मराठी भाषण

माझा भारत महान

धन्य धन्य हे भारत माते,

मला तुझा अभिमान,

दिशा दिशातून आज गर्जते,

तुझ्या यशाचे गान....

    या देशाला प्राचीन सांस्कृतिक, समृद्ध परंपरांचा इतिहास लाभला आहे. या देशाची भूमी हरित समृद्धतेने नटलेली आहे. या देशातल्या संस्कृतीचा प्रवास ज्ञानापासून तत्त्वज्ञानाकडे, परंपरांपासून पुरोगामीत्वाकडे झाला आहे. अशा या माझ्या महान भारत देशाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये अभिमानाची ज्योत फुरफुरत असते.

      उत्तरेकडील हिमालय पर्वत जणू भारत भूमीच्या शिरावर मुकुटासारखा शोभून दिसतो आहे. गंगा, यमुना,सिंधू सारख्या नद्या त्यांच्या पैलतीरावरील भूमीला समृद्धी आणि संपन्नतेचे वरदान देत आहेत.धनधान्य आणि फळाफुलांनी बहरलेले शेतमळे हे आमच्या कृषीप्रधान देशाचे वैभव आहे.

"जहाँ डाल डाल पर सोनेकी   चिडीयां करती है बसेरा,वह भारत देश है मेरा । "

        खंडप्राय अशा माझ्या भारत देशामध्ये प्रांतिक, सांस्कृतिक धार्मिक, भाषिक इत्यादी अनेक बाबतीत विविधता आढळते. परंतु ज्याप्रमाणे सूर सात असले तरी संगीत मात्र एक असते, त्याचप्रमाणे इथल्या प्रचंड विविधतेत नांदणारी एकता, हे माझ्या देशाचे भूषण आहे. भारत ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची, दृष्ट संहारक श्रीकृष्णाची भूमी आहे. याच भूमीवर अनेक संतांनी अध्यात्माच्या माध्यमातून समानतेची, संस्कृतीची गुढी उभी केली. शाहू फुले आंबेडकरांसारख्या महामानवांनी मानवतावादाची शिकवण इथल्या समाजाला दिली. गांधी,टिळक भगतसिंग,सावरकर यांसारख्या महान रत्नांना याच भूमीने जन्म दिला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या तेजाने या देशाचा इतिहास दैदिप्यमान झाला.

      पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या देशाच्या प्रगतीला सुरुवात झाली. स्वातंत्र्यांने निश्चितच आम्हाला आधुनिकतेचे वरदान दिले. भाक्रा- नांगल सारखी अनेक धरणे बांधून शेती व वीज क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली. गेल्या 75 वर्षात हेक्टरी उत्पादन  वाढले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती गगनाला भिडली आहे. पृथ्वी,नाग,आकाश,त्रिशूल,अग्नी यांसारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करून माझ्या देशाने संरक्षण सिद्धता साध्य केली आहे. लसीकरणाच्या माध्यमातून रोगांचे निर्मूलन केले आहे. 1986 च्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकरण होऊन शिक्षण गरिबांच्या झोपडी पर्यंत पोहोचले.

     अशाप्रकारे भौतिक आणि अभौतिक अशा सर्वच बाबतीत माझ्या देशाच्या प्रगतीचा आलेख सदोदित उंचावतच आहे. भविष्यामध्ये हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर उभे राहून माझा देश साऱ्या जगाला भौतिक,नैतिक व सांस्कृतिक प्रगतीचा आदर्श सांगणार आहे. कारण इथल्या भौतिक प्रगतीच्या वेगाला नैतिकतेचे अधिष्ठान आहे. आधुनिकतेच्या पर्वाला संस्कार आणि संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. फक्त हे वैभव आपण प्रत्येक भारतीय नागरिकांनी जपायला हवे. भूतकाळातील ऐतिहासिक वारसा पाठीशी घेऊन वर्तमानातील समस्यांना तोंड देत, भविष्यातील उज्वल यश प्राप्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. एकाने शंभर पावलं चालण्यापेक्षा 100 जण मिळून हातात हात घालून एक पाऊल चालू या! येणारा दिवस आपलाच असेल आणि भविष्यामध्ये विश्वाच्या क्षितिजावर आपला तिरंगा ध्वज सर्वोच्च ठिकाणी फडकताना दिसेल. शेवटी साने गुरुजींच्या शब्दात अपेक्षा व्यक्त करतो...

 ' बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.'