January 3, 2023

माझा भारत महान मराठी भाषण निबंध Majha Bharat Mahan




 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत मराठी भाषण

माझा भारत महान

धन्य धन्य हे भारत माते,

मला तुझा अभिमान,

दिशा दिशातून आज गर्जते,

तुझ्या यशाचे गान....

    या देशाला प्राचीन सांस्कृतिक, समृद्ध परंपरांचा इतिहास लाभला आहे. या देशाची भूमी हरित समृद्धतेने नटलेली आहे. या देशातल्या संस्कृतीचा प्रवास ज्ञानापासून तत्त्वज्ञानाकडे, परंपरांपासून पुरोगामीत्वाकडे झाला आहे. अशा या माझ्या महान भारत देशाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये अभिमानाची ज्योत फुरफुरत असते.

      उत्तरेकडील हिमालय पर्वत जणू भारत भूमीच्या शिरावर मुकुटासारखा शोभून दिसतो आहे. गंगा, यमुना,सिंधू सारख्या नद्या त्यांच्या पैलतीरावरील भूमीला समृद्धी आणि संपन्नतेचे वरदान देत आहेत.धनधान्य आणि फळाफुलांनी बहरलेले शेतमळे हे आमच्या कृषीप्रधान देशाचे वैभव आहे.

"जहाँ डाल डाल पर सोनेकी   चिडीयां करती है बसेरा,वह भारत देश है मेरा । "

        खंडप्राय अशा माझ्या भारत देशामध्ये प्रांतिक, सांस्कृतिक धार्मिक, भाषिक इत्यादी अनेक बाबतीत विविधता आढळते. परंतु ज्याप्रमाणे सूर सात असले तरी संगीत मात्र एक असते, त्याचप्रमाणे इथल्या प्रचंड विविधतेत नांदणारी एकता, हे माझ्या देशाचे भूषण आहे. भारत ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची, दृष्ट संहारक श्रीकृष्णाची भूमी आहे. याच भूमीवर अनेक संतांनी अध्यात्माच्या माध्यमातून समानतेची, संस्कृतीची गुढी उभी केली. शाहू फुले आंबेडकरांसारख्या महामानवांनी मानवतावादाची शिकवण इथल्या समाजाला दिली. गांधी,टिळक भगतसिंग,सावरकर यांसारख्या महान रत्नांना याच भूमीने जन्म दिला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या तेजाने या देशाचा इतिहास दैदिप्यमान झाला.

      पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या देशाच्या प्रगतीला सुरुवात झाली. स्वातंत्र्यांने निश्चितच आम्हाला आधुनिकतेचे वरदान दिले. भाक्रा- नांगल सारखी अनेक धरणे बांधून शेती व वीज क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली. गेल्या 75 वर्षात हेक्टरी उत्पादन  वाढले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती गगनाला भिडली आहे. पृथ्वी,नाग,आकाश,त्रिशूल,अग्नी यांसारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करून माझ्या देशाने संरक्षण सिद्धता साध्य केली आहे. लसीकरणाच्या माध्यमातून रोगांचे निर्मूलन केले आहे. 1986 च्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकरण होऊन शिक्षण गरिबांच्या झोपडी पर्यंत पोहोचले.

     अशाप्रकारे भौतिक आणि अभौतिक अशा सर्वच बाबतीत माझ्या देशाच्या प्रगतीचा आलेख सदोदित उंचावतच आहे. भविष्यामध्ये हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर उभे राहून माझा देश साऱ्या जगाला भौतिक,नैतिक व सांस्कृतिक प्रगतीचा आदर्श सांगणार आहे. कारण इथल्या भौतिक प्रगतीच्या वेगाला नैतिकतेचे अधिष्ठान आहे. आधुनिकतेच्या पर्वाला संस्कार आणि संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. फक्त हे वैभव आपण प्रत्येक भारतीय नागरिकांनी जपायला हवे. भूतकाळातील ऐतिहासिक वारसा पाठीशी घेऊन वर्तमानातील समस्यांना तोंड देत, भविष्यातील उज्वल यश प्राप्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. एकाने शंभर पावलं चालण्यापेक्षा 100 जण मिळून हातात हात घालून एक पाऊल चालू या! येणारा दिवस आपलाच असेल आणि भविष्यामध्ये विश्वाच्या क्षितिजावर आपला तिरंगा ध्वज सर्वोच्च ठिकाणी फडकताना दिसेल. शेवटी साने गुरुजींच्या शब्दात अपेक्षा व्यक्त करतो...

 ' बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.'