January 15, 2023

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण माझा भारत महान






प्रजासत्ताक दिनानिमित्त

मराठी भाषण

     माझा भारत महान

 आम्ही सारे भारतीय आहोत.

 भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.

 प्रार्थनेच्या वेळी प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याकडून ही प्रतिज्ञा म्हणून घेतली जाते या प्रतिज्ञातून व्यक्त होणाऱ्या भावना लहानपणापासूनच मुलांच्या मनात दृढ होत जातात.

   आपल्या भारत मातेच्या अफाट पसरलेल्या भूमीवर विविध भाषा, विविध संस्कृती,अनेक जाती अनेक धर्मांची लोक आहेत. या देशात उत्तरेला जम्मू काश्मीर पासून दक्षिणेला तामिळनाडू केरळ पर्यंत, पश्चिमेला असलेल्या गुजरात महाराष्ट्रापासून ते पूर्वेच्या आसाम नागालँड पर्यंत 29 राज्य आहेत प्रत्येक राज्याची स्वतःची अशी मातृभाषा,  बोलीभाषा यामध्येही विविधता आहे.

 हिंद देश के निवासी,

 सभी जन एक है 

 रंग रूप वेश भाषा

 चाहे अनेक है ।'

 या भारत देशामध्ये हिंदू हा प्रमुख धर्म मानला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदू संस्कृती प्रत्येक भारतीयांच्या नसानसात भिनलेली आहे. असे असले तरी याच भूमीवर मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, बौद्ध अशा अनेक धर्मांनाही तेवढाच मानसन्मान दिला जातो. प्रत्येक धर्मातील सण सारख्याच प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हिंदू धर्मातील दिवाळी,होळी,गणेशोत्सव यांसारख्या सण-उत्सवांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन बांधव सामील होताना दिसतात. तर मुसलमान बंधूंच्या ईद मध्ये हिंदू लोक ही आनंदाने भाग घेतात. ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणासाठी तर  सर्वच भारतीय एकमेकांना 'मेरी ख्रिसमस' असे म्हणत केक, मिठाई शुभेच्छा ख्रिसमस ट्री ची सजावट यांचा वर्षाव करतात. म्हणून कवी वसंत बापट प्रार्थना करतात....

 भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना

 मानवाच्या एकतेची, पूर्ण होवो कल्पना 

 मुक्त आम्ही फक्त मानू, बंधूतेच्या बंधना

 सत्य सुंदर मंगलाची,नित्य हो आराधना

 अशा या उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन्मधुर भावना असलेल्या देशांमध्ये मात्र काही वेळा जातीय दंगली, धार्मिक तेढ, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, परकीय आक्रमणे अशा काही भयानक संकटांचा सामना करावा लागत आहे. कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमा भागात  चालू असलेला संघर्ष, पूर्वेला धुमसत असलेला नक्षलवाद, स्वतंत्र विदर्भासाठी चालू असलेले आंदोलन, दोन राज्यांमध्ये असलेला पाणी प्रश्न अशा देशांतर्गत चालू असलेल्या समस्यांबरोबरच शेजारील देशांची आक्रमणे, घुसखोरी,दहशतवाद यांसारख्या भयानक संकटांशी दोन हात करावे लागत आहेत.

   भाषाभेद,दारिद्र्य,बेकारी आर्थिक विषमता,भ्रष्टाचार, लाचखोरी, वशिलेबाजी यांच्या खाईत लोटलेल्या भारतीयांची आपल्या स्वतःची भारतीयत्वाची जाणीव हळूहळू बोथट होऊ लागली आहे. एकमेकांशी प्रेमळ संवाद करणारे डोळे दुसऱ्याकडे संशयाने बघू लागले आहेत. असे असताना माझा देश,माझे देश बांधव, मी भारतीय अशी एकजुटीची भावना कशी बळकट होणार?

पण सभोवतालच्या दुःखांना संकटांना घाबरतील तर ते भारतीय कसले ?

' भीती न आम्हा तुझी मुळी ही

 गडगडणाऱ्या नभा,

 अस्मानीच्या सुलतानीला

 जबाब देती जिभा'

 असे निर्भीडपणे सांगणाऱ्या भारतीयांच्या नसानसातून देशाभिमान, एकात्मता या भावना उसळून वाहत आहेत.

   इतिहासाची पाने चाळली तर लक्षात येईल की, लाखो लोकांनी आजपर्यंत देशासाठी बलिदान दिले आहे. अजूनही लोक देशाच्या अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी बलिदान देत आहेत. त्यासाठी आपण भारतीयांना  अभिमान असला पाहिजे. आपणही आपापल्या परीने देशासाठी काही ना काहीतरी  योगदान दिले पाहिजे.

   आपण सारे भारतीय एकत्र आलो तर काय चमत्कार घडेल! आपल्या भारतामध्ये अशा कितीतरी चांगल्या बाजू आहेत. आपला देश जगामध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश आहे. हीच आपली मोठी शक्ती आहे.

 आपण जर या मनुष्यबळाचा कुशलतेने वापर करून घेतला तर जगामध्ये आपला देश सर्वात शक्तिशाली होईल.

      दुष्ट शत्रूंविरुद्ध लढण्याची हिंमत आम्हाला श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून दिलेली आहेच. त्याचबरोबर अलीकडच्या काळातील स्वातंत्र्यसैनिक, थोर समाजसुधारक उदाहरणार्थ- लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यापासून ते आधुनिक काळातील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर,अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजासाठी वाहून घेतलेल्या थोर व्यक्तीमत्त्वामुळे सर्वांनाच देश प्रेमाची प्रेरणा मिळते. मग लढा स्वातंत्र्याचा असो वा परकीय आक्रमणांचा. ते आंदोलन भ्रष्टाचार निर्मूलनाचे असो वा अंधश्रद्धा निर्मूलनाचे.आपण सारे भारतीय एकजूट होऊनच लढू.कारण

 'भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई!

 पावन भूमी भारतातली ही आमची आई!!

 धन्यवाद!