माझा भारत महान
मराठी भाषण
माझा हिंदुस्थान,माझा,माझा हिंदुस्थान ।
हिमाचलाचे हीरक मंडित शिरभूषण भरदार ।।
वक्षावर गंगा यमुनांचे सळसळती मौक्तिक हार ।
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार ।।
महोदधीचे चरणा जवळी गर्जतसे आव्हान ।।
माझ्या भारतभूचे हे वर्णन ऐकताना रोमरोम फुलून येतो आणि निसर्गाच्या या मुक्त लावण्याबरोबरच गिरीशिखरांचे आणि महासागरांचे आव्हान नजरेसमोर ठाकते. भारताच्या नावाबरोबरच मला आठवते ती माझ्या देशाची अनेकविध परंपरा,संस्कृती आणि पवित्र्य यांचा मनोहर संगम इथं विनयाच्या कोंदणात शौर्य खुलतं तसा लाजऱ्या स्मितातून शालिनीता खुलते. शृंगाराबरोबर वीरता आणि विविधतेतून एकता हे माझ्या देशाचे रमणीय रूप आहे.
माझ्या देशाची संस्कृती संपूर्ण विश्वात वंदनीय, पूजनीय आहे.म्हणूनच स्वामी विवेकानंदांची माय 'ब्रदर्स अँड सिस्टर्स ' ही हाक साऱ्या धर्म मार्तंडाचे काळीज काबीज करून गेली.
माझ्या देशावर निसर्गाने आपले लावण्य मुक्तहस्ते उधळले आहे. जणुसृष्टीचा लावण्य महोत्सवच. उत्तुंग हिमगिरी, नजर फिरेल अशा खोल दऱ्या,खळखळ करणाऱ्यांना नद्या,डोलणारी हिरवी शेती, तऱ्हेतऱ्हेची मनोहर फुले आणि पावला पावलावर बदलणारी अनेक मनोहर दृश्ये. निसर्गाचे हे मुक्त लावण्य जगाच्या पाठीवर कुठेही नाही. इंद्रधनुचे सात रंग, मोरपिसांची मोहक रंगसंगती यांचा सुरेख लावण्यविलास फक्त माझ्या देशातच पाहायला मिळतो.
'श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटेचोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे.'
हे फक्त माझ्या देशातच शक्य आहे.निसर्गाच्या या मुक्त लावण्यात आणखी एक रंग मिसळला आहे लाल. तो रंग आहे रक्ताचा.स्वधर्म, स्वदेश यांच्यासाठी ज्यांनी या धरणीवर आपले रक्त सांडले,तो रक्ताचा लाल रंग माझ्या देशातील त्यागाची महती सांगतो. सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,कृष्णदेवराय,राणा प्रताप या महापराक्रमी राजांनी माझ्या देशाचा इतिहास आपल्या रक्तांनी रंगवला आहे आणि माझ्या देशाची संस्कृती 'त्यागाची आहे भोगाची नाही' हे सिद्ध केले आहे.
संस्कृती, संस्कृती असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला एक अर्थ आहे.हा अर्थ 'प्रकृती,विकृती आणि संस्कृती' या तीन शब्दाधारे व्यक्त करता येतो. भूक लागली असता खान ही प्रकृती. भूक लागली नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला याची अधिक गरज आहे हे पाहून त्याला खायला घालणं ही संस्कृती आणि हीच आमची संस्कृती आहे. म्हणून तर 'अतिथी देवो भव' हा महामंत्र आम्ही जपला आहे.
यजमानाचा धर्म आणि अतिथीचे स्वागत हे आमच्या संस्कृतीचे दोन स्तंभ आहेत. आमच्या संस्कृतीची शालिनीता, पावित्र्यता जपण्यासाठी आमच्या स्त्रियांनी सुद्धा आपले सर्वस्व पणाला लावले आहे म्हणून तर.......
'अहिल्या, द्रौपदी,सीता,तारा मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम्
असे आम्ही म्हणतो.आपल्या शालिनीतेने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आमच्या स्त्रियांनी आपल्या शौर्यानेही जगाचे डोळे दीपवले आहेत. राणी लक्ष्मीबाई,राणी चन्नम्मा,जिजाऊ माँसाहेब,अहिल्या होळकर, ताराराणी या स्त्रियांनी आपल्या डोईवरचा पदार्थ तसुभरही न हलवता हातात तलवारी घेतल्या आणि शालिनीता,पावित्र्य याचबरोबर रणचंडीकाही जगाला पाहायला मिळाल्या. हे फक्त माझ्या देशातच घडू शकते.
माझ्या देशाची ही संस्कृती, ही परंपरा साऱ्या जगात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे हे मी अभिमानाने सांगतो.रामाचा त्याग, लक्ष्मण- भरताचे बंधुप्रेम,हनुमानाची स्वामिनीष्ठा, सीतेची पतीनिष्ठा, अर्जुनाचे शौर्य, भीमाची ताकद आणि कृष्णाचे कर्मयोग हे फक्त माझ्या देशातच निर्माण झाले. राम- कृष्णाची परंपरा,शिवाजी महाराज, राणा प्रताप यांचा चा इतिहास ही माझ्या देशाची श्रद्धास्थाने आहेत. शंकराचार्य, रामशास्त्री,भवभूती,कालिदास, व्यास,वाल्मिकी राजाभोज,शाहू महाराज,भगतसिंग,महात्मा गांधी, नेहरू, सावरकर, टिळक यांच्यापासून ते ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, कुसुमाग्रज यांच्यापर्यंतची अगणित अनमोल रत्ने केवळ माझ्या देशाच्या मातीतच जन्मली. हा माझ्या देशाचा तर गौरव आहेच पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तींचा गौरव जास्त आहे ज्यांना भारतभूसारखी मातृभूमी लाभली.
अंतराळात आज आमची विमाने भिरभिरत आहेत. आमच्या पाणबुड्या सागरतळाचा शोध घेत आहेत.आमचे डॉक्टर नवनवीन औषधे शोधण्यात मग्न आहेत.आमचे शास्त्रज्ञ मानवाचे जीवन अधिकाधिक सुखी करण्यात प्रयत्नशील आहेत. आमचे खेळाडू देशाचा ध्वज आंतरराष्ट्रीय सामन्यातून अभिमानाने उंचावत आहेत. आमची मुस्लिम शीख भावंडे आमच्या हातात हात घालून चालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या सत्ताधारी पक्षाने व विरोधी पक्षांनी आमच्या देशातील लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत ठेवली आहे.
म्हणूनच नेहरूंसारखा पुरुषोत्तम या देशाच्या मातीतच आपली रक्षा विसर्जित व्हावी अशी इच्छा बोलून दाखवतो तर भगतसिंग सारखा तेजस्वी युवक हसत हसत फासावर जाताना 'पुनर्जन्म जर असेल तर तो मला भारत भूमीतच मिळावा' अशी आस मनी बाळगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर ' ने मजसी ने परत मातृभूमीला ' अशी त्या सागराला विनवणी करतात तर इकबाल सारखा एखादा कवी 'हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा 'अशी जाहीर कबुली देऊन माझ्या देशाला मानवंदना देतो. माझ्या देशाचा तिरंगा आपल्या तीन रंगाने विविधतेतून एकतेबरोबरच आमची त्यागाची,शांततेची आणि समृद्धीची प्रतिमा आसमानापर्यंत उन्नत मानेने सांगतो आहे.
माझ्या देशाच्या या साऱ्या सत्यशील,सुंदरतेला दृष्ट लागू नये म्हणून हत्याकांडाचे भ्रष्टाचाराचे, गालबोट लागले आहे.हे गालबोट जोपर्यंत चेहऱ्यावरील तिळाच्या रूपात असते तोपर्यंत ते सौंदर्यतीत ठरते पण हे गालबोट जर साऱ्या सौंदर्यावर पसरले तर या सुंदरतेची कुरूपता व्हायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवायचं तुम्ही,आम्ही साऱ्यांनी ज्यांना तिरंगा पाहताना भरून येत त्यांनी.
म्हणूनच मित्रांनो चला, तुम्हाला खळाळणाऱ्या सागराची आण... तुम्हाला या भूमीच्या कणाकणाची शपथ..... या माझ्या देशाची ही गौरवशाली परंपरा,त्या परंपरेचे आपण पाईक आहोत.म्हणूनच आपण एक मुखाने म्हटले पाहिजे...
गे माय भू तुझे मी,
फेडीन पांग सारे.
आणीन आरतीला,
हे सूर्य,चंद्र तारे.
धन्यवाद!