माझा आवडता ऋतू मराठी निबंध
आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद,हेमंत व शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. सर्व ऋतूंमध्ये वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो.
पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. कारण तो हवाहवासा वाटत असतानाच येतो. डोक्यावर रणरणणारे ऊन,पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मानेवर अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी जीव नकोसा झालेला असतो, उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात, सर्व सृष्टीच पावसासाठी जणू उसाचे टाकत असते,सर्व पशुपक्षीदेखील थंडगार सावलीचा निवारा शोधत असतात आणि त्याचवेळी पाऊस येतो धो- धो कोसळत. वातावरणातील उकाड्याचा सर्व ताप तो स्वतः शोषून घेतो. रोमारोमांत गारवा शिरतो, चराचर सृष्टी तृप्त होते.असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार नाही?
जून मध्ये शाळा सुरू होते.त्याच्या आसपास पावसाळा सुरू होतो. नवे वर्ष, नवा वर्ग, नवा गणवेश,नवी पुस्तके आणि नवी छत्री या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते. त्याचवेळी हा चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो. त्याच्यासोबत नाचत बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगांच्या छत्र्या तऱ्हेतऱ्हेचे रेनकोट यांमुळे शाळेकडे जाणारी वाट रंगानी फुलून जाते.वाटते की जणू ती वाटच आपल्या सोबत उत्साहाने शाळेत येत आहे!
हा पाऊस मोठा जादूगार आहे. तो रुक्ष रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो. पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमली सारखी हिरवळ पसरते. वृक्षवेली हिरव्या रंगांच्या विविध छटांनी नटतात. शेते हिरव्यागार रोपांनी डोलू लागतात. खळाळणारे ओढे नाले सगळीकडून धावत असतात. सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते.
या पावसाची रूपे तरी किती? कधी तो थुई थुई नाचत येतो.कधी रिमझिमत येतो; कधी तो धो धो कोसळतो; तर कधी प्रचंड गडगडाट करत, विजांचा चकचकाट करत धुवाधार बरसतो.
एखाद्या दिवशी प्रचंड काळेभोर ढग आकाशात अवतरतात. भर दिवसा जणू रात्र सुरू होते.पाऊस पडून गेला की धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते. अचानक उघडीप येते, तेव्हा सर्वत्र हिरवागार गालीचा पसरल्यासारखे वाटते. पहावे तेथे मन वेडावून टाकणारी हिरवाई दिसते. क्वचित सूर्याला पावसाची मजा लुटायची लहर येते. मग ढगांना बाजूला सारून तो नभांगणात उतरतो. त्याची सोनेरी किरणे पावसात चमचमू लागतात आणि काय आश्चर्य! आकाशात ते मनोहरी इंद्रधनुष्य तरळू लागते आणि बालकवींच्या ओळी मनात अलगद उतरतात -
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे!
असा हा सुखदाता पावसाळा सर्वसृष्टीचा पोशिंदाही आहे.तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरणी मातेला सुजलाम सुफलाम बनवतो. चार महिन्यात हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची, धान्याची बेगमी करतो. म्हणूनच मी म्हणतो की,वर्षाऋतू म्हणजे पावसाळा हाच सर्व ऋतूंचा राजा आहे!