June 23, 2023

विज्ञान विषय शिक्षक पदोन्नतीबाबत महत्वाचा शासन निर्णय




विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती बाबत महत्त्वाचा शासन निर्णय 





विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकांची कमतरता विचारात घेऊन, विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करण्यास प्रवृत्त करावे. अशा शिक्षकांची पदस्थापना विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकाच्या जागेवर करण्यात यावी आणि प्रत्यक्ष पदवी प्राप्त करेपर्यंत त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येऊ नये, अशी तरतूद उक्त संदर्भ क्रमांक २ येथील शासन परिपत्रकान्वये करण्यात आली आहे. परंतु उक्त संदर्भ क्र.१ येथील अधिसूचनेमधील तरतूद क्र. (४) ख अनुसार शिक्षकाची एका स्तरामधून दूसऱ्या स्तरामध्ये पदोन्नती करताना एनसीटीई ने निश्चित केलेली किमान अर्हता धारण करणे आवश्यक आहे. यामधील तरतुदीनुसार इ. ६ वी ते ८ वी वर्गाकरीता असलेली प्रशिक्षीत पदवीधर अर्हता, तसेच सद्यस्थितीत विज्ञान शाखेतील पदवीधर उमेदवारांची उपलब्धता विचारात घेता, शासन परिपत्रक दि. १३.१०.२०१६ मधील अ. क्र. ६ येथील तरतुद कालबाह्य ठरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे:-


शासन परिपत्रक-


शासन परिपत्रक दिनांक १३.१०.२०१६ मधील अ. क्र. ६ येथील तरतूद वगळण्यात येत असुन, सदर तरतुदीनुसार विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत या शिक्षकांनी पदवी अर्हता धारण केली नसल्यास, अशा शिक्षकांची पदस्थापना मूळ पदांवर करण्यात यावी. ०२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध


करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०६२३१३२२१६६०२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.