June 26, 2023

हिरवे मित्र - वरूण वृक्षाची ओळख





 नमस्कार मित्रांनो,

 आज आपण 'हिरवे मित्र'  या ज्ञान मालिकेमध्ये वरुण वृक्षाची ओळख करून घेणार आहोत.

 वरूण हा मध्यम आकाराचा वृक्ष निम सदाहरित वनांमध्ये नदीकाठी वाढतो. तो शहरातही अनेक ठिकाणी लावलेला दिसतो. वरुणाची पाने बेलासारखी तीन पर्णिकांनी बनलेली असतात. हिवाळ्यात ही सारी पाने गळतात.हिवाळा संपता संपता वरुणाला शुभ्र पांढरी, सुवासिक, अत्यंत सुंदर फुले येतात. या फुलांमध्ये गुलाबी रंगाचे फुलांच्या बाहेर डोकावणारे पुंकेसर असतात.ही फुले जेव्हा फुलतात तेव्हा झाडावर पाने नसतात. त्यामुळे गच्च फुलांनी बहरलेले वरुणाचे झाड खूप आकर्षक भासते. फुलांच्या तळाशी मधुरस असतो. एकदा फुलांचे परागीभवन झाले की ती पिवळी पडतात. कधी कधी या फुलांसोबतच झाडावर नवी कोवळी पालवी अवतरते. वरुणाच्या सालीपासून 'वरूणादी क्वाथ ' नावाचे औषध मिळते.वरुणाला ' वायवर्ण 'असेही एक नाव आहे.वरूण हा अनेक ठिकाणी मंदिरांजवळ, बौद्ध धर्मीयांच्या मठाजवळ लावलेला असतो. त्यामुळे तो भारतातल्या धार्मिक महत्वाच्या वृक्षांपैकी एक आहे.त्याचे पुंकेसर कोळ्यांच्या लांबसडक पायांसारखे दिसतात. म्हणून वरुणाला इंग्लिश मध्ये 'स्पायडर ट्री 'असे नाव आहे.