July 27, 2023

15 August मराठी भाषण आपला स्वातंत्र्य दिन


स्वातंत्र्य दिवस मराठी भाषण

15 ऑगस्ट मराठी भाषण




 अध्यक्ष महाशय ,गुरुजन वर्ग,  उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,

 आज आपल्या आनंदाचा दिवस .उत्साहाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. भारताचे समाज क्रांतीचा आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचा. त्यांच्या कर्तृत्वाचा विजय म्हणजे स्वातंत्र्य दिन. 150 वर्षे इंग्रजांच्या जुलूमशाहीतून मुक्त झालेल्या भारताचा हा स्वातंत्र्य दिन.

          मित्रहो,आज आपण अतिशय सुस्थितीत आणि सुरक्षित आहोत.तो पारतंत्र्याचा काळ आठवून पहा.कसे जगले असतील हे लोक? कसा सहन केला असेल त्यांनी इंग्रजांचा अत्याचार ?अहो नुसते आठवले तरी अंगावर शहारे येतात.व्यापारी म्हणून आलेल्या या गोऱ्यांनी आपल्या भारतात बस्तान बसवले.हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. आपल्या भोळ्याभाबड्या ,काही अंशी अडाणी जनतेवर त्यांनी हुकूमत गाजवणे सुरू केले.

    पाहता पाहता त्यांनी सर्व देश व्यापला आणि राज्यकर्ते बनले. 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी 'अशा पद्धतीने त्यांनी भारतीय जनतेला गुलाम बनविण्याचा चंगच बांधला. अनेक व्यवसाय सुरू केले. भारतीय जनतेला नोकरी देऊन त्यांच्यावर हुकूमत दाखवून कसलीही कामे इंग्रज सरकार करून घेऊ लागले.

    हळूहळू जनतेच्या लक्षात येऊ लागले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा वीट येऊ लागला होता आणि अशातच क्रांतीच्या ज्वाला भारतीय तरुणांच्या रक्तात भडकू लागल्या. भगतसिंग,राजगुरू,सुभाषचंद्र बोस,वासुदेव बळवंत फडके अशा अनेक धुरंधरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले.अहिंसेचा मार्ग स्वीकारत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांनी ब्रिटिशांच्या हुकूमशाहीचा निषेध करत अनेक आंदोलने केली, सत्याग्रह केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"  असे विश्वासपूर्ण उद्गार काढत भारतीयांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देत इंग्रजी सत्तेला त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असे परखडपणे विचारत लोकमान्य टिळकांनी इंग्रजा विरुद्धची आपली चळवळ बळकट केली.

      "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा l " असे भावनिक आवाहन भारतीयांना करत सुभाष बाबूंनी 'आझाद हिंद सेना ' नावाची सशस्त्र क्रांतीची बलाढ्य फौज गोऱ्या इंग्रजा विरुद्ध उभी केली. कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वातंत्र्य हे मिळवावयाचेच,असा चंग प्रत्येक नेत्यांनं मनाशी बांधला होता. प्राण गेला तरी बेहत्तर, पण माझ्या मायभूमीला मी पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त करणारच, अशी क्रांतीची चळवळ भक्कम करत असताना इंग्रजांनी आपल्या नेत्यांवरही अनेक प्रकारचे अत्याचार केले.

       कुणाला काळ्यापाण्याची शिक्षा दिली, कुणाला जन्मठेप तर कुणाला चक्क फाशीला दिले! अशा क्रूर,दुष्ट इंग्रजांचा नायनाट व्हावा म्हणून त्यांनी ते सहनही केले. वि.दा. सावरकर,लाला लजपतराय,सरदार वल्लभ भाई पटेल,महात्मा ज्योतिबा फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर अशा अनेक नेत्यांनी समाज क्रांतीसाठी आणि देश हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. अनेकांच्या बलिदानाने, अनेक नेत्यांच्या कर्तृत्वाने भारत देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला आणि आपण जुलमी इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झालो.

      आता आपण मुक्तपणे जगायला सिद्ध झालो.मित्रहो स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेले त्यावेळचे नेते, त्यांचे चरित्र वाचले तरी अंगावर रोमांच उठतात. रक्त सळसळते आणि आताच्या राजकारणी नेत्यांचे घोटाळ्यांचे पराक्रम पाहिले तर वाटते की, खरंच आपला देश स्वतंत्र झाला आहे काय? मित्रहो,आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे भाषण येथेच थांबवतो.

 जय हिंद! जय भारत!