August 17, 2024

रक्षाबंधन मराठी निबंध



रक्षाबंधन 

नारळी पौर्णिमा या सणांची माहिती


सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,

ओवाळिते भाऊराया,

वेड्या बहिणीची वेडी रे माया।

       या गाण्याच्या ओळी आठवण करून देतात भाऊबीजेची. मला या सणासारखाच वाटणारा, आवडणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. भावा- बहिणीचे नाते दृढ करणारा हा सण. राखी पौर्णिमेला मला आठवते, ती राणी कर्मावतीची गोष्ट. राणी कर्मावती ही एक रजपूत स्त्री. पण तिने मुघल सम्राट हुमायूनला राखी पाठवली. या एका धाग्याने सारा इतिहासच बदलला. मुघल सम्राटाने राणी कर्मावतीची राखी स्वीकारली; आणि तिने जोडलेले भावाचे नातेदेखील निभावले. आपापसातील वैर, भांडण मिटवून प्रेमाचे, आपुलकीचे नाते जोडले. या गोष्टीवरून राखीचे महत्त्व लक्षात येते की नाही ? या सणाच्या निमित्ताने बंधुभाव निर्माण करता येतो. भावाने बहिणीचे रक्षण करणे, हे त्याचे कर्तव्य असते नि त्या कर्तव्याची भावना राखीच्या धाग्याने दृढ होते.

पूर्वी हळदीमध्ये भिजवलेल्या सुती दोऱ्यात मोहरी व सोने बांधून राखी तयार केली जात असे. या राखी बांधण्यामागे हेतू होता, भावाचे अशुभापासून रक्षण व्हावे व भावाने बहिणीचे तिच्या संकटकाळी रक्षण करावे. असा दुहेरी बंधन असलेला हा सण पूर्वापार साजरा होत आहे.

आज बाजारात विविध कलाकुसरीच्या राख्या पाहायला मिळतात. राख्यांचे स्वरूप अधिकाधिक कलात्मक होत असले, तरी त्यामागील हेतू, भावना मात्र तीच आहे. भावा-बहिणीच्या निःस्वार्थ प्रेमाचे नाते सांगणारा हा सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो.


 नारळी पौर्णिमा


          याच दिवशी येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. हा सण म्हणजे खास कोळी लोकांचा, खलाशांचा. यांचे जीवन समुद्राशी निगडित असते. आषाढात समुद्र खवळतो, वादळ होण्याची शक्यता असते; त्यामुळे समुद्रातून होणारा व्यापार, होणारा प्रवास मंदावतो. पुन्हा श्रावणापासून हे व्यवहार सुरू होतात. पण त्यापूर्वी खवळलेल्या समुद्राला शांत करून त्याची पूजा करतात. त्या समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो.

          समुद्रकिनारी वाढणारी झाडे म्हणजे नारळाची झाडे. ह्या नारळाचे फळ म्हणजे श्रीफळ. ह्यांला हिंदूंनी पवित्र मानले आहे. म्हणून कोणत्याही शुभ कार्यात श्रीफळाला मानाचे स्थान दिले जाते. कोणाचाही आदर- सत्कार करताना आपण त्याला श्रीफल देतो ना, तसेच हे कोळी लोक समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याचा आदर-सत्कार करतात.

           या सणाचे पक्वान्न म्हणजे नारळी भात. अशा त-हेने हे दोन्ही सण आपल्याला बरेच काही शिकवतात.